आज 21 ऑक्टोबर - ■ राष्ट्रीय पोलीस दिवस -

आज 21 ऑक्टोबर - 

 

 ■ राष्ट्रीय पोलीस दिवस - 

 

21 ‍ऑक्टोबर 1959 रोजी CRPFचे पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात अक्साईचीनच्या दुर्गम भागात 16,000 फुटांवर असलेल्या Hot Springs या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूंविरोधात लढा दिला. 

 

या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी  21 ‍ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते. 

 

आपल्या देशातील असंख्य पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांच्या केलेल्या त्यागाची आठवण कायम राहावी म्हणून चाणक्यपुरी या देशाच्या राजधानी दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय पोलीस स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्मारक पोलीस दलातील शहिदांनी अतुलनीय शौर्य, धाडस दाखवून केलेल्या पराक्रमाची ओळख जपेल व प्रेरणास्रोत म्हणून सतत कार्य करीत राहील.

 

राष्ट्रीय पोलीस स्मारक 30 फूट आयताकृती ग्रेनाईटच्या स्तंभांनी साकारले आहे. कर्तव्य बजावत असताना देशभरातील विविध पोलीस दलातील मृत्युमुखी पडलेल्या 36050 शहिदांच्या नावे या स्मारकात विविध स्तंभांवर कोरली गेली आहेत. ही नावे पोलिसांच्या शौर्याची व गौरवाची आठवण या स्मारकास भेट देणाऱ्यांना अविरत देत राहील. हे पोलीस स्मारक  पोलीस शहीददिनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  21 ऑक्टोबर 2018 रोजी राष्ट्राला अर्पण केले गेले. 

 

राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या तळघरात कायमस्वरूपी पोलीस संग्रहालयाची उभारणी केली गेली आहे. सदर संग्रहालयात राज्य व केंद्रीय पोलीस दले यांच्याशी संबंधित विविध साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. सदर संग्रहालयात कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले व मरणोत्तर अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांसारख्या पदकांनी पुरस्कृत केलेल्या शहिदांसाठी एक विशेष गॅलरी तयार केली आहे.

 

देशात पहिल्यांदाच पोलीस या विषयावर आधारित कायमस्वरूपी राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात आले आहे. विविध पदकांच्या प्रतिकृती, सभारंभीय व कार्यरत पोशाख, टोप्या, फेटे, शिरस्त्राणे, बॅटन, कंबरपट्टे, श्वानपथकाची वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रे, घोडेस्वार पोलिसांच्या पथकांची छायाचित्रे, भारतीय पोलीस कायद्याच्या जुन्या प्रती, महिला पोलीस पथकांची छायाचित्रे, वृत्तपत्रांमधली पोलिसांशी संबंधित ऐतिहासिक महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे, पूर्वीपासून आतापर्यंत वापरली जाणारी वायरलेस उपकरणे इत्यादी प्रत्येक राज्यातून आणि केंद्रीय पोलीस दलांकडून मागवून संग्रहालयात प्रथमच प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी .

माहिती स्त्रोत  - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार.  

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास हरकत नाही.