आज 20 डिसेंबर -
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग भार्गव कद्रेकर यांचा वाढदिवस -
जन्म - 20 डिसेंबर, 1928 .
डॉ. कद्रेकर यांचा जन्म 20 डिसेंबर, 1928 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीमधील पटवर्धन हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी आपल्या गुणवत्तेवर सरकारी शिष्यवृत्ती मिळवून 1950 साली बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली.
श्रीरंग कद्रेकर हे कृषी खात्यात नोकरी करत असताना 1958 मध्ये एम.एस्सी. झाले. कृषी विद्यापीठात नोकरी करत असताना त्यांनी 1971 मध्ये रसायनशास्त्र व मृदाशास्त्र या विषयांत पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी 1950 मध्ये ‘मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव’ येथे संशोधक म्हणून नोकरीस प्रारंभ केला.
वेगवेगळ्या जमिनीत ऊस पिकाचे पोषण व साखर उतारा, तसेच गुळाची प्रत आणि रंग, चव, टिकाऊपणा यांचा अभ्यास करून त्यांनी संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केले.
पाडेगाव येथील 10 वर्षांच्या संशोधनानंतर 1977 पर्यंत कद्रेकर यांनी अकोला, कोल्हापूर व दापोली येथील कृषी महाविद्यालयात मृदाशास्त्र विषयाचे पदवीपूर्व व पदव्युत्तर अध्यापन केले. नंतर त्यांनी दापोली येथे 03- वर्षे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. डॉ. कद्रेकर यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता व कुलगुरू या नात्याने महाराष्ट्राच्या कोकण विभागात कृषी शिक्षण रुजवून फलोत्पादनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
कद्रेकर यांच्या कुलगुरु पदाचा कालावधी सहा वर्षे होता. त्यांना 09 डिसेंबर,1987 ते 08 डिसेंबर,1993 असा दुहेरी कालावधी मिळाला.
त्यांनी कोकणवासीयांना कृषी विषयाचे व विद्यापीठाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिवापाड मेहनत केली. मुलांना कृषी शिक्षणासाठी कृषी विद्यापीठात आकृष्ट करून कोकणातील विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढवण्याचे काम त्यांना करावे लागले.
कोकणात 1987 नंतर मोठा फलोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोलाचा उपयोग झाला.
कुलगुरु म्हणून कार्यरत असताना विद्यापीठात वनशास्त्र विभाग सुरू झाला, मात्र विद्यापीठाकडे स्वतःचं वन नव्हतं, सरांनी सर्व कर्मचाऱ्यांना दर आठवड्यास श्रमदानाला प्रेरित करून वन उभं केलं. स्वतःचं वन असलेले एकमेव कृषी विद्यापीठ आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना स्वतःच्या प्रक्षेत्रावर फलोत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करून विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून दर्जेदार कलमे व रोपे केवळ कोकणातच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात पुरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यासाठी डॉ. कद्रेकर यांना सन 1996 चा वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा ‘फलोत्पादन पुरस्कार’ देण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांत शासनमान्य रोपवाटिका तयार झाल्या व अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.
डॉ. कद्रेकर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या शेती, फलोद्यान, मृदा व जलव्यवस्थापन या विषयांतील ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र जल व सिंचन आयोगावर’ कोकणचा प्रतिनिधी म्हणून व कोयना अवजल वापर विषयाच्या अभ्यास गटावर तज्ज्ञ म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली.
डॉ. कद्रेकर यांचा रत्नागिरीमधील कोकण मराठी साहित्य परिषद,पटवर्धन हायस्कूल,आदि अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक संस्थांशी जवळचा संबंध आहे. विविध संस्थांनी आयोजित केलेल्या शेती आणि पर्यावरण विषयक परिसंवादांमध्ये डॉ. कद्रेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
लाल मातीत रंगलो मी हे डॉ. कद्रेकर यांचे आत्मचरित्र उत्कर्ष प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.
त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार तसेच अनेक ठिकाणी विविध संस्थांकडून सरांचे सत्कारही झाले आहेत.
निवृत्तीनंतर भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष म्हणून व्यापक कार्य.
कोकणच्या पाण्याच्या समस्येबद्दल भरपूर लेखन आणि विचार प्रकटन. कोयना अवजलाचा वापर याबद्दल शासन नियुक्त समितीचे अशासकीय सदस्य होते.
डॉ. श्रीरंग कद्रेकर सरना रत्नागिरी मीडिया परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 💐💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास
हरकत नाही.