आज - 10 डिसेंबर -
● आंतरराष्ट्रीय 'मानवी हक्क' दिवस!
मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत.
मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात.
हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात.
दरवर्षी 10 डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 10 डिसेंबर, 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 1950 मध्ये 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला.
मानवी हक्क दिवस साजरा का करतात -
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी 10 डिसेंबर हा 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो.
मानवी हक्क दिवसाची थोडक्यात माहिती
मानवाधिकारांच्या घोषणापत्रात एकूण 30 कलमे असून या घोषणापत्रावर आधारित “मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक” 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. 1976 मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सर्वात प्रथम जगातील 48 देशांनी हा दिवस साजरा केला.
भारतात लागू असलेला मानवी हक्क कायदा
भारतात 28 सप्टेंबर, 1993 ला मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर 12 ऑक्टोबर, 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या कार्यक्षेत्रांतही लागू करण्यात आला.
मानवी हक्कांची व्याख्या
मानवी हक्क म्हणजे सर्व मनुष्याला प्राप्त झालेले असे मूलभूत अधिकार, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, निवास, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसते. यामध्ये कुठल्याही प्रकराचा भेदभाव नसतो.
मूलभूत मानवी हक्क
1. अभिव्यक्ती स्वातंत्र्य
2. मतदान करण्याचा तसेच निवडणूक लढवण्याचा अधिकार
3.प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि सुरक्षेचा अधिकार
4. शिक्षणाचा अधिकार
5. कायद्यासमोर समानतेचा अधिकार
अशाप्रकारचे एकूण 25 अधिकार आपल्याला मुलभूत मानवी हक्कांद्वारे प्राप्त झालेले आहेत.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्रोत - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.