आज 13 एप्रिल -
● एका वेगळ्या वाटेवरचे त्रिशतक -
■ खलवायन, रत्नागिरी या संगीत, सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची सलग 300 - वी मासिक संगीत सभा.
● रत्नागिरीच्या सांस्कृतिक व सांगितीक क्षेत्रात सुवर्णाक्षरात नोंदवावा असा आजचा दिवस.
● एका आगळ्या विक्रमाची नोंद.
● आज 13 एप्रिल, 2024 संस्थेची सलग 300 - वी मासिक संगीत सभा (कोविड - 19 महामारीचा काळ वगळता) आहे.
आज 300 - वी मासिक संगीत सभेत रत्नागिरीतील आघाडीची गायिका शमिका श्रीकांत भिडे यांच्या सुश्राव्य गायनाने संपन्न होत आहे.
रत्नागिरीचा सांस्कृतिक आलेख उंचावणार्या व बदल घडवणार्या खल्वायन संस्थेविषयी -
11 ऑक्टोबर 1997 ला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) विनायक जोशी यांच्या घरी नटराजपूजन करून संस्थेची स्थापना झाली.
सामवेदावर प्रभुत्व असणार्या ‘खल्व’ ऋषींच्या नावावरून स्थापन झालेल्या रत्नागिरी शहरातील ‘खल्वायन’ असे संस्थेचे नाव ठेवण्याचे सर्व संस्थापक सदस्य व कलाकारांच्या एकमताने ठरवून संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात आली.
सातत्याने दरमहा रत्नागिरीमध्ये संगीतविषयक उपक्रम सुरू ठेवावेत, त्याचवेळी चर्चेतून दरमहा एक संगीत सभा आयोजन, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा विशेष संगीत सभांचे आयोजन हे उपक्रम निश्चित झाले.
' आधी केले मग सांगितले ' या उक्तीप्रमाणे मासिक संगीत सभांचे पहिल्या वर्षीचा आर्थिक भार स्वतः (कै.) विनायक जोशी यांनी उचलण्याचे दिलेले आश्वासन तंतोतंत पाळले.
सुरूवातीच्या काळात एकूणच संगीत त्यात करून शास्त्रीय संगीत हे जरा आव्हानात्मक काम होते. आजच्या एवढ्या दळणवळणाच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. पण ठरल्या शनिवारीच मासिक संगीत सभा घ्यायची हा विनायकरावांचा कटाक्ष असायचा. त्यांच्या जोडीला मनोहर जोशी, श्रीनिवास जोशी, प्रदीप तेंडुलकर सर, योगेश सामंत, संदीप शेट्ये जयंत यादव, महेश दामले, संजय हर्डीकर, पुरूषोत्तम केळकर, राजेश दामले, शरद बंडबे, आदि त्यांच्याबरोबरीने व तळमळीने काम करणारे होते. पण त्याबरोबरच इथे आणखीन एक उल्लेख आवर्जून करणे आवश्यक आहे तो म्हणजे विनायकरावांच्या दुकानातील त्यांचा सेल्समन आणि नंतर संस्थेचे प्रकाश योजनेचे काम पहाणारा गोपी म्हणजेच गोपीकांत भुवड. मासिक संगीत सभेच्या पूर्व तयारीचे काम हे बहुतांशी गोपी करत असे. त्यानंतर
नारायण जायदे, दिलीप केतकर, स्मिता करंदीकर, श्रीकांत भाटवडेकर, प्रथमेश शहाणे व गणेश जोशी यांचे संस्थेत आगमन झाले.
त्याकाळात आजच्या सारखी सोशल मिडीया उपलब्ध नव्हती. त्यामुळे कार्यक्रमाचे लाकडी चौकटीवरील बोर्ड तयार करून ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे व पुन्हा परत आणणे हे मोठे जबाबदारीचे आणि जोखमीचे असेच होते.
दुसरी गोष्ट अशी की सुरूवातीला ह्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांना आठवत असेल तर सुरुवातीच्या काळात ह्या मासिक संगीत सभेचे आयोजनाचे पोस्ट कार्ड पाठवत असत. कार्यक्रमांत जसजसे सातत्य आले तसे मग लोक आपणहून कार्यक्रमाविषयी चौकशी करून उपस्थित राहू लागले.
कोणतीही सामाजिक असो अगर सांस्कृतिक असो, संस्था चालवायची म्हणजे त्यासाठी जसे कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे तसेच आर्थिक नियोजनही तेव्हढेच महत्वाचे. संस्थेच्या कार्यक्रमांचे सातत्य, दर्जा, विविधता याविषयी खात्री झाल्यावर संस्थेला आर्थिक हातभार लावणारे हातही तेवढ्याच ताकदीने पुढे आले.
दोनच वर्षांपूर्वी संस्थेचा रौप्य महोत्सव होवून गेला आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विनायकराव जोशी यांनी एका विशिष्ट ध्येयाने सुरू केलेला हा उपक्रम संस्थेचे विद्यमान पदाधिकारी व सदस्य मनोहरराव व श्रीनिवास जोशी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली चालवत आहेत ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
दरमहा दुसर्या शनिवारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात मासिक संगीत मैफल रंगते. या सभा सर्व रसिकांसाठी विनामूल्य असतात. मासिक संगीत सभेची सुरूवात 08 नोव्हेंबर, 1997 रोजी राजापूर तालुक्यातील कशेळी येथील कलाकार चिंतामणी सखाराम भागवत तथा बंडूकाका भागवत यांच्या गायन मैफिलीने झाली. ती अविरत आजपर्यंत मात्र कोविड - 19 कोरोना महामारीचा काळ वगळून.
या संगीत सभांमधून रत्नागिरीतले स्थानिक कलावंतां बरोबरच, मुंबई, पुणे, सांगली, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक आदि ठिकाणच्या कलावंतांच्या गायनकलेचा आस्वाद रत्नागरीकर संगीतप्रेमींनी घेतला आहे.
मैफिलींच्या निमित्ताने गेल्या 25 वर्षात 350 पेक्षा जास्त कलाकारांना व्यासपीठ मिळाले. यामध्ये दिग्गज तसेच नवोदित कलाकार तसेच बालकलाकारांचाही समावेश आहे. नवनवीन कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम संस्थेने केले आहे / करत आहे. रत्नागिरीमध्ये शास्त्रीय, सुगम संगीताचे वातावरण तयार करण्यास या मैफलींचा खूप उपयोग झाला. या मैफलींना नियमित रसिकांची संख्याही हळुहळू वाढू लागली. अगदी सुरवातीला काही ठठराविक रसिक असायचे पण नवनवीन कलाकार येऊ लागल्याने त्यांना ऐकण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी होऊ लागली.
रत्नागिरीकरांना ' कानसेन ' बनवण्यातही खल्वायन संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण फक्त कलाकार मोठा असून चालत नाही तर तितक्याच आनंदाने ऐकणारा रसिक श्रोताही तसा असावा लागतो. सुरवातीला शास्त्रीय, अभंग, नाट्यगीते, सुगम संगीत गायन करणारे कलाकार मैफली रंगवत होते. परंतु कालांतराने फक्त वाद्यवादनाची मैफलही रंगू लागली. यामध्ये स्थानिक वादक कलाकार आणि रत्नागिरीबाहेरील दिग्गज कलाकारही सादरीकरण करू लागले. या मैफली रत्नागिरीकरांना आवडू लागल्या आणि वाद्यसंगीत हा प्रकारही वेगळा व भावणारा असू शकतो याची जाणीव रसिकांना होऊ लागली, ही खल्वायन संस्थेची जमेची बाजू आहे.
दरवर्षी गुढीपाडवा व दिवाळी पाडवा या दिवशी विशेष संगीत मैफलींचे आयोजन केले जाते. याद्वारे जगभरात ख्याती पावलेले दिग्गज कलाकार ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना लाभली आहे. आजपर्यंत सौ. आरती अंकलीकर - टिकेकर, शौनक अभिषेकी, उपेंद्र भट, सौ. प्रणती म्हात्रे, विजय कोपरकर, सौ. मंजुषा कुलकर्णी - पाटील, सौ. मंजिरी कर्वे - आलेगांवकर, सौ. मीना फातर्पेकर, सौ. पद्मा तळवलकर, अरविंद पिळगावकर, सौ. अर्चना कान्हेरे, अनुराधा कुबेर, मेघनाथ कोल्हापुरे, पं. रामकृष्णबुवा गणेश बेहेरे (कुर्धे), सौ. प्रचला अमोणकर, सौ. अश्विनी भिडे - देशपांडे, पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. तुळशीदास बोरकर, डॉ. विद्याधर ओक, शैलेश भागवत, संजीव मेहेंदळे, सौ. माधवी नानल, बालगंधर्व रसिक मंडळ, पुणे, विद्याधर गोखले प्रतिष्ठान, मुंबई इत्यादींच्या गायनाचा आस्वाद रत्नागिरीकर रसिकांनी घेतला.
■ संस्था दरवर्षी संगीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तसेच,
महाराष्ट्राला लाभलेली वैभवशाली संगीत नाट्य परंपरा जपण्यासाठी व नवीन पिढीला संगीत नाटकांची गोडी लागावी व नवनवीन कलाकार संगीत रंगभूमीवर यावेत यासाठी संगीत नाट्यनिर्मिती संस्था करत आहे.संस्थेने आजपर्यंत 08 नवीन व 06 जुन्या संगीत नाटकांची तसेच 8 गद्य नाटकांची व तीन एकांकिकेची यशस्वी निर्मिती केलेली आहे.
खलवायनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, हितचिंतकांना, देणगीदारांना रत्नागिरी मिडीया परिवाराकडून तसेच वैयक्तिक माझ्या कुटुंबियांकडून अनेकोत्तम शुभेच्छा.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्रोत - खलवायनचे सचिव श्रीनिवास जोशी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही .