आज - 19 ऑक्टोबर -
रत्नागिरी जिल्ह्याचा परिचय भाग - 01
रत्नागिरी जिल्हा म्हटला की मुळातच निसर्गदत्त असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. त्याचा परिचय करून देणे एका पोस्ट मध्ये शक्य नसल्याने मुद्दाम दोन भागांमध्ये देत आहे. आपल्या जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती; त्यात बागायत आली उद्योग आले सांस्कृतिक जडणघडण धार्मिक स्थळे सण - उत्सव आदि गोष्टी. त्याचप्रमाणे कलाकार कलावंत महनीय व्यक्ती जे आपल्या लाल मातीने दिले यांचाही उल्लेख यानिमित्ताने जमेल तेवढा सविस्तर करावा लागेल. क्षेत्र समुद्रकिनारे नदी - नाले महत्त्वाच्या ठळक घटना यांचा विचार व उहापोह त्यानिमित्ताने होईल.
#जिल्ह्याची रचना प्रथम पहावी लागेल.
सन 1981 झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या 720 किलोमीटर मुद्रकिनार्यालगतच्या ज्याला आपण कोकणपट्टी म्हणतो त्या कोकणपट्टीत जे 4 जिल्हे वसले आहेत त्यापैकी एक रत्नागिरी जिल्हा. उत्तरेला रायगड (अलिबाग) दक्षिणेला सिंधुदुर्ग पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा त्यापलीकडे कोल्हापूर सांगली सातारा हे जिल्हे येतात. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो 16.30 ते
18 .04 उत्तर अक्षांश व 73.02 ते 73.52 पूर्व रेखांश या भौगोलिक पट्ट्यामध्ये वसला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे चिंचोळ्या होत जाणाऱ्या कोकणपट्टीत जिल्ह्याचे क्षेत्र पसरले आहे.
मंडणगड - दापोली - खेड - चिपळूण - गुहागर - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर अशा नऊ तालुक्यांचा जिल्ह्यात समावेश आहे. कोकण रेल्वेमुळे रत्नागिरीच्या आर्थिक प्रगतीला अधिक चालना मिळाली आहे.
जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सर्वसाधारणपणे 180 किलोमीटर आहे. परंतु पूर्व - पश्चिम रुंदी मात्र 64 किती किलोमीटर आहे. एकूण भौगोलिक रचना बघता जिल्ह्याचे तीन स्वभाविक विभाग पडतात.
1 . पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश डोंगरमाथा व सभोवतालचा प्रदेश .
2. मध्य भागामध्ये सह्याद्री पर्वतापासून पंधरा किलोमीटर अंतरानंतर चा आणि किनारपट्टीपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतराच्या प्रदेशाचा समावेश होतो. त्याला स्थानिक भाषेत वलाट पट्टी असे म्हणतात.
3. तिसरा स्वाभाविक विभाग म्हणजे किनारपट्टी व लगतचा भूभाग. हा पट्टा मुद्रकिनार्यापासून जवळपास पंधरा किलोमीटर दूरपर्यंत पसरला आहे. याला स्थानिक भाषेत खलाट पट्टी असे म्हणतात.
जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पावसाचे प्रमाण तीन हजार मिलिमीटर आहे. जून ते ऑक्टोबर हा पाच महिन्यांचा कालावधी पावसाचा म्हटला जातो. जिल्ह्यातील हवामान दमट आर्द्र असून जिल्हा समुद्र किनाऱ्यालगतचा असल्याने दिवसाच्या अथवा रात्रीच्या विविध ऋतुतील उष्णतामानात फारसा बदल होत नाही. स्वाभाविकच उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते.
जिल्ह्यातील सावित्री - वाशिष्टी - शास्त्री - जगबुडी - बाव - मुचकुंदी आणि जैतापूर या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जात अरबी समुद्राला मिळतात. जिल्ह्यातील शेती व्यवसाय साठी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जिल्ह्यात मध्यम प्रकल्प चार लघु पाटबंधारे प्रकल्प जिल्ह्यात एकूण 1543 गावे असून 844 ग्रामपंचायती कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी - चिपळूण - खेड - राजापूर या चार नगरपालिका तर दापोली - लांजा - देवरुख संगमेश्वर - गुहागर - मंडणगड अशा यापूर्वी ग्रामपंचायती होत्या त्या आता नगरपंचायती झाल्या आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय रत्नागिरी येथे असून राज्याच्या मुंबई या राजधानीच्या शहरापासून 370 किलोमीटर अंतरावर पनवेल पणजी राष्ट्रीय महामार्गापासून 13 किलोमीटर दूर आहे .
जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे वनांमध्ये विविध जातीचे वन्यजीव अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रान डुक्कर ; गवा; भेकड; सांबर; ससा ; वानर ; कोल्हा; साळींदर; रानमांजर; उदमांजर ; बिबट्या ; लांडगा ; घोरपड ; मोर ; मगर या जाती प्रामुख्याने आढळतात.
जिल्ह्याला ऐतिहासिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे. ब्रह्मदेश राजा थिबा याला तत्कालीन ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले होते. रत्नागिरीतील थिबा राजवाडा व राजाची समाधी देखील सुस्थितीत आहे. राजा थिबा यांना आदरांजली वाहण्यासाठी म्यानमारमधील नागरिक तसेच उच्चपदस्थ व्यक्ती वेळोवेळी भेट देत असतात. तसेच इंग्रज सरकारने रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवलेल्या स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या महापुरुष यामुळे पावन झालेला रत्नागिरी जिल्हा. याबरोबरच परशुरामाची भूमी व्यास मुनींची भूमी म्हणूनही रत्नागिरीची ओळख. मध्ययुगात अनेक युरोपियन प्रवाशांनी व धर्मोपदेशक आणि कोकण किनारपट्टीला भेट दिली आहे. प्राचीन कोकणावर मौर्य सातवाहन त्रैकुटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार कदंब यादव या राजवंश यांनी स्वामित्व गाजवले. सातवाहनाच्या काळात पन्हाळेकाजी येथील लेणी बौद्ध धर्माच्या अध्ययनाची व प्रसाराचे केंद्र होती. रत्नागिरीचा देश - परदेशातील अन्य भागांची समुद्रमार्गाने व्यापार झाल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर; पा. वा. काणे; महर्षी धोंडो कर्वे अशा तीन भारतरत्नाची ही भूमी आहे. सावरकर; लोकमान्य टिळक; साने गुरुजी; मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर; रँग्लर परांजपे; स्वामी स्वरूपानंद अशा नररत्नांची भूमी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जिल्हा.
जिल्ह्यात शाळा महाविद्यालय व्यवसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था असून मेडिकल महाविद्यालय आदि शैक्षणिक व्यवस्था चांगली उपलब्ध आहे .
रामनवमी - हनुमान जयंती - भवानी उत्सव - श्रीकृष्ण जन्मोत्सव - शिवजयंती - गणेश उत्सव - शिमगा सण - उत्सव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गौरी गणपती हा या जिल्ह्यातील मुख्य आकर्षण करणारा सण आहे. गौरी - गणपतीला घरोघरी गणेश मुर्ती आणल्या जातात व आकर्षक सजावट करून दहा दिवस हा उत्सव चालतो. होळीच्या सणाला तेवढाच महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गावोगावी ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात ढोल ताशांच्या गजरात या पालख्या नाचवले जातात. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम दुर्गेचे एक सार्वजनिक मंदिर जाखाई - जुगाई - मानाई - वाघजाई - भैरी - वीर केदार या देवतांच्या चांदीच्या प्रतिमा पालखीत बसवून मिरवणुका निघतात. गौरी गणपती व शिमग्याच्या सणात येथील प्रामुख्याने कुणबी व अन्य समाजात नाचण्याची पद्धत आहे. यामध्ये लोक फेर धरून नाचतात या नृत्याला जाकडी म्हणतात. धार्मिक कार्यात होमहवन स्थानिक देवतांची पूजा वगैरे केली जाते या सणांसाठी कामधंदा निमित्त बाहेरगावी असणारी मंडळी आवर्जून गावाकडे धावून येतात. नमन खेळे जाखडी दशावतारा सारख्या कलांच्या माध्यमातून इथल्या कला व संस्कृती त्यांचे जतन केले जात आहे .
** उर्वरित माहिती दुसर्या भागात देत आहे **
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.