आज 10 डिसेंबर -
पुस्तकांसाठी आयुष्य वेचणारे
ग्रंथसूचिकार शंकर गणेश दाते म्हणजेच सूचिकार शं. ग. दाते यांचा स्मृतिदिन .
जन्म - 17 ऑगस्ट , 1905 ( रत्नागिरी ) .
मृत्यू - 10 डिसेंबर , 1964 .
ग्रंथांचे महत्त्व ओळखून चरितार्थासाठी नोकरीचा मोह टाळून आजन्म ग्रंथांच्या सहवासात राहणा-या ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा स्मृतिदिन -
दाते यांचा जन्म रत्नागिरी येथे 17 ऑगस्ट, 1905 रोजी झाला. शिक्षण प्रथम मुंबई व नंतर पुणे येथे. पुण्याच्या ‘सर परशुरामभाऊ कॉलेज’ मध्ये बी. ए.च्या अखेरच्या वर्षासाठी ते होते; तथापि त्या परीक्षेस मात्र ते बसले नाहीत.
लहानपणापासूनच लेखन–वाचनाची आवड. दुर्मिळ ग्रंथ जमा करण्याचा त्यांना छंद होता. त्यांच्या लोककथांचे दोन संग्रह (1929, 1930) हे त्यांच्या संग्रहवृत्तीचे पहिले फलित.
कोणत्याही स्वरूपाच्या नोकरीच्या प्रलोभनाला टाळून त्यांनी सर्व आयुष्य ग्रंथ जमविणे, ग्रंथांच्या वर्गीकरणासंबंधी लेखन करणे आणि पुढे मराठी ग्रंथसूचीची सिद्धता करणे यासाठीच खर्ची घातले.
कार्यैकनिष्ठा, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी आणि सूचिशास्त्रातील काटेकोरपणा या गुणांमुळे दाते यांनी सुरू केलेले ग्रंथसूचीचे दुर्घट कार्य तडीस गेले. या एकाच कार्याचा ध्यास घेतल्याने, शासकीय वा अन्य संस्थांचे पाठबळ नसतानाही दाते यांचा महदुद्योग यशस्वी झाला.
दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह करण्याचे त्यांना जणू व्यसनच होते. ग्रंथ जमविणे, त्यांच्या वर्गीकरणासंबंधी लेखन करणे, पुढे त्यांची सूची करणे, या सा-यांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या या प्रचंड कामातूनच 1800 ते 1937 व 1938 ते 1950 या काळातील प्रकाशित मराठी ग्रंथांच्या सूचीचे दोन खंड तयार झाले. आणि ‘दाते ग्रंथ सूची’ तयार झाली. आजही त्यांच्या या कामाचा संशोधक अभ्यासकांना अतिशय चांगला उपयोग होतो.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन 1901 ते 1913 या काळातील ‘राष्ट्रीय ग्रंथसूची’ची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
त्यांचे हे कार्य सुरू असतानाच, 10 डिसेंबर, 1964 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मरणार्थ मुंबई मराठा ग्रंथसंग्रहालयाने ‘शंकर गणेश दाते ग्रंथसूची मंडळ’ स्थापन केले आहे ज्याचे काम आजही पुढे चालू आहे.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे , रत्नागिरी .
माहिती स्रोत - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार .
नावासह पोस्ट Like, Share & Forward करण्यास हरकत नाही .