आज - 12 ऑक्टोबर - विजयादशमी अर्थातच दसरा

विजयादशमी अर्थातच दसरा

 

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा 

 

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. त्यानंतर  दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

 

 साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य संपन्न केली जातात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी केली जाते.

 

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.

 

 प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता.  पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात. 

 

श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

 

या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते.पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते.त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.

 

विजयादशमी दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती  नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.