महोत्कट अवतार
शास्त्रांतर्गत गणपतीचे एकूण २४ अवतार सांगितले आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला एक याप्रमाणे १२ महिन्यांचे २४ अवतार झाले. ह्यापैकी २२ अवतारांचा फारसा तपशील उपलब्ध नाही. मात्र भाद्रपद शुध्द चतुर्थी आणि माघ शुध्द चतुर्थी ह्या दोन चतुर्थ्यांचे अवतार विशेष प्रसिध्द आहेत. भाद्रपद शुध्द चतुर्थीला शिवपार्वतीचा पुत्र गजानन गणेश ह्याचा जन्म झाला आणि माघ शुध्द चतुर्थीला कश्यप आणि अदिती या ॠषीदाम्पत्याच्या पोटी 'महोत्कट विनायक' ह्या गणपतीच्या अवताराचा जन्म झाला.
हे दोन्ही अवतार लढवय्ये, मुत्सद्दी आणि त्यांच्या त्यांच्या काळात जनमानसाला आनंदाचे उधाण आणणारे असे होते. गणपती हा विषय मोठा गोड आहे. न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद ह्या प्रख्यात पंडितांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की, 'श्रीगणेशाचे चरित्र विशाल समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखे अथांग आणि विस्तीर्ण आहे.
आपल्याला गणपतीबद्दल जे ज्ञान झाले आहे ते त्यातल्या वाळूच्या एका कणाएवढे आहे.' न्यायरत्न विनोदांसारख्या प्रख्यात अधिकारी पंडित पुरुषाने जे उद्गार काढले ते सार्थ ठरतील अशाप्रकारे गणपतीचे स्वरुप लोकमानसात निरंतर चढते-वाढते असे आहे. गणपतीविषयी संशोधित पुस्तके प्रतिवर्षी निघत असतात. परदेशातही गणपतीबद्दल खूप मोठे कुतुहल आणि औत्सुक्य आहे.
गणपतीच्या चरित्राची एक खासियत अशी की, तुम्ही कोणताही विषय काढा त्याचा गणराजाशी संबंध जोडून दाखविता येतो. कारण रणांगणात सेनापती पद कुशलतेने सांभाळणारा हा वीरपुरुष नृत्य-गायनातही रस घेतो, गोडधोड आनंदाने खातो, नवी लिपी निर्माण करतो, व्यासांसारख्या महाकवीने लिहिलेले 'महाभारत' लीलया लिहून घेतो आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनात आपल्या केवळ दर्शनाने आनंदाचे भरतें आणतो.
आपल्याकडचे देव हे खरेच होऊन गेले किंवा काय? ह्याबद्दल शंका प्रस्थापित केली जाते. खरे म्हणजे, रामाची अयोध्या, कृष्णाची द्वारका आजही दृष्टीस पडतात. आपली परंपरा अशी की जो कोणी नरपुंगव विशेष पराक्रम करीत त्याला आपण देवपदी बसवितो. राम आणि कृष्ण ह्यांना तर अवतारी पुरुष मानतो. गणपतीच्या अवताराबद्दल विचार केला असता महोत्कट विनायकाचे जे उपलब्ध चरित्र आहे ते कोणत्याही प्रकारच्या शंकेला निमंत्रण देणारे नाही. त्याने केलेले पराक्रम अद्भुत असले तरी शक्य कोटीतील वाटतात.
त्याचा विशाल दृष्टिकोन आपल्याला आकर्षित करतो. मात्र शिवपार्वतीचा नंदन गजानन गणेश ह्याबद्दल त्याच्या जन्मापासूनच काहीसे गूढरम्य असे वातावरण आहे. त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या कथा ह्यानंतर रचलेल्या असतील, असे वाटू शकते. अर्थात, हा विचार अलीअलीकडच्या पिढयांना सुचला असणार हे उघड आहे. पूर्वी देवांच्या चरित्राबद्दल चिकित्सक वृत्ती दाखविणे हे शिष्टसंमत नव्हते. आता मात्र प्रत्येक ठिकाणी माणसे चिकित्सक पध्दतीने विचार करतात आणि साध्या साध्या गोष्टीचाही कीस पाडतात.
दोन्ही अवतारातील गणपतीच्या अस्तित्वाची प्रचिती, त्याच्या कृपाछत्राची शाश्वती, त्याच्या भक्तांना वाटत असतेच आणि बहुसंख्य लोक गणपतीचे हे दोन्ही अवतार, त्याची दोन्ही रुपे एकच आहेत, असे समजून चालतात. अध्यात्माच्या विषयात शिवपार्वतीनंदन गजानन गणेश हा मार्गदर्शक आहे. तर ऐहिक जीवनात मिळवावयाच्या सुखसोयीबद्दल आणि आनंदाबद्दल महोत्कट विनायक हा जास्त प्रभावी असा आहे. आपण गणनायक, विनायक, गजानन, गजमुख ही सर्व नावे गणपतीला उद्देशून वापरतो. पण शिवपार्वतीचा पुत्र गजानन गणेश हा गजमुख म्हणजे हत्तीचे शिर असलेला आहे, ह्याबद्दल वाद नाही. मात्र महोत्कट विनायक हा गजमुख गजाननाचे तोंड असलेला असा त्याचा उल्लेख असला तरी त्या गजमुखाची उत्पत्ती सांगणारी कथा सर्वमान्य स्वरुपात उपलब्ध नाही.
कित्येक संशोधक महोत्कट विनायक हा हत्तीच्या डोक्याची ढाल करुन युध्दभुमीवर वावरत होता, असे समजतात. कित्येकजण महोत्कट विनायक ह्या देवांच्या सेनापतीचे रणांगणावरील ध्वजचिन्ह गजमुख होते, असेही सांगतात. पण शिवपार्वतीचा नंदन गजानन गणेशाच्या विषयात जशा कथा आहेत तशा माघ शुध्द चतुर्थीला जन्मलेला महोत्कट विनायकाच्या बाबतीत उपलब्ध नाहीत आणि विशेष गोष्ट अशी की ह्या गजमुखाबद्दल जास्त प्रमाणात रुढ असलेली कथा म्हणजे जगन्माता पार्वतीने आपल्या देहावरील मळापासून तयार केलेली मूर्ती, तिचा शिवशंकाराने केलेला शिरच्छेद, मग त्या धडाला लावलेले गजमुख असा सगळा क्रम सुसंगतपणे मांडलेला असला तरी गजमुखासंबंधी अनेक ठिकाणी अनेक लोककथा आणि दंतकथादेखील रुढ आहेत. आपल्या गजानन गणेशाचे एक रुप म्हणता येईल असे लंकेत 'कतरगाम' नावाचे दैवत आहे.
त्या देवतेचा कोप झाला तर आपल्यावर संकट ओढवेल म्हणून तिला सगळेच घाबरतात. दंतकथेप्रमाणे हा देव एक कुमार नावाचा भारतीय राजा होता. त्याचा भाऊ गणपती. एकदा हे दोघे शिकार करण्यासाठी म्हणून जंगलात गेले असता तिथे कुमार राजा एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला. पण ती त्याच्याशी लग्न करण्यास राजी होत नव्हती. म्हणून कुमार राजाने तिला हत्तीची भीती वाटते हे समजल्यावर गणपतीला हत्तीचे रुप घेऊन तिच्यासमोर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणपतीने हत्तीचे रुप धारण करण्यापूर्वी कुमार राजाला एक जलपात्र देऊन ती तरुणी लग्नाला झाल्यावर त्या पात्रातील पाणी आपल्यावर शिंपडण्यास सांगितले.
त्या पात्रातील पाण्यामुळे गणपतीला आपले मानवी रुप परत मिळणार होते. अपेक्षेप्रमाणे पुढे घडले पण चुकून त्या पात्रातील पाणी सांडले. त्यामुळे गणपतीला गजमुख असलेल्या रुपातच राहावे लागले. अर्थात यामध्ये डावी सोंड आणि उजवी सोंड यांचा संबंध येत नाही. डाव्या सोंडेच्या गणपतीला अधिक प्रमाणात भजले जाते आणि उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल जनमानसात थोडीशी धास्ती असते. अर्थात ही धास्तीसुध्द भ्रामक आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त भारताच्या इतर भागात जेथे जेथे गणेशपूजन विशेषत्वानें केले जाते तेथे तेथे उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल अशी धास्ती दिसून येत नाही. महाराष्ट्रात मात्र उजव्या सोंडेचा गणपती म्हटले की लोक थोडे घाबरतात. . उजव्या सोंडेच्या गणपतीला 'सिध्दिषवनायक' म्हणतात. हा बहुधा 'सिध्दि-बुध्दि' या त्याच्या पत्नींबरोबर असतो. पैकी सिध्दि ही सर्वप्रकारचे यश आणि समृध्दी देणारी आहे आणि बुध्दि ही प्रतिभा देणारी, मनःशांती देणारी आणि बिकट प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणारी अशी म्हणजेच बुध्दिदात्री आहे.
आजच्या अंगारकीच्या दिवशी आपण गणपतीच्या ह्या रुपांना आणि त्याचबरोबर सिध्दि-बुध्दिनांही मनोभावे वंदन करुया...
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी