आज 26 ऑक्टोबर -
आविष्कार या रत्नागिरी येथील मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी असणाऱ्या शाळेचा 38 वा वर्धापन दिन -
मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने गेल्या 37 - 38 वर्षांमध्ये अनेक ‘आविष्कार’ घडवले आहेत.
आपल्यातील कमतरता लपविण्याकडे, आपल्यातील समस्या उघडपणे सांगून त्यावर उत्तरे व पर्याय शोधण्यापेक्षा त्यावर पांघरूण घालण्याकडे आणि त्याची जबाबदारी इतरांवर ढकलण्याकडे आपला कल अधिक असतो. त्यामुळे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समानुभूती (एम्पथी) न देता सहानुभूती (सिम्पथी) आणि दया दाखविण्याचे किंवा हेटाळणी करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. या सामाजिक पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील ‘आविष्कार’ ही संस्था अशा मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी गेली 35 - वर्षे कार्यरत आहे.
समाजामध्ये मानसिकदृष्ट्या अपंगत्व असणारे मूल हे विषय गणले जाते . अशी मुले सामान्यपणे लोकसंख्येच्या 2 ते 3 टक्के एवढेच निपजतात. रत्नागिरी शहर व परिसराचा विचार करता हे 2 ते 3 टक्के म्हणजे 2 ते 3 हजार एवढी संख्या येते . या विद्यार्थ्यांच्या सुविधाही वेगळ्या प्रकारच्या द्याव्या लागतात . त्यामुळे अशा सुविधा मुंबई पुण्यामध्येच उपलब्ध होत होत्या परंतु या गोष्टींचा सर्वांगीण विचार करून अविष्कार या संस्थेने 26 ऑक्टोबर 1986 रोजी रत्नागिरी येथे अशा प्रकारची शाळा 09 विद्यार्थी घेऊन सुरू केली. सध्या 300 सभासद या संस्थेमध्ये कार्यरत आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे आपला सहभाग संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी देत आहेत .
संस्थेचे उपक्रम -
■ सौ . सविता कामत विद्यामंदिर -
ऑक्टोबर 1986 मध्ये आविष्कार ही शाळा 9 विद्यार्थी घेऊन सुरू केले . सध्या या शाळेत 96 विद्यार्थी आपली उपस्थिती नोंदवतात. या शाळेमध्ये 07 स्पेशल टीचर्स , 03 हस्तकौशल्य तर वीस सहाय्यक शिक्षक / कर्मचारी या मुलांना वेगवेगळी कौशल्ये शिकवणे , ही मुले आत्मनिर्भर कशी होऊ शकतील याकडे लक्ष पुरवतात .
■ वर्षा चोक्सी चाईल्ड गाईडन्स क्लिनिक -
येथे आठवड्यातून दोन वेळा मुलांची आरोग्य तपासणी केली जाते .
मुलाच्या शाळेतील प्रवेशावेळी यासाठी तज्ञ डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षण तज्ञ अशी संस्थेची संयुक्त समिती मुलाच्या पालकांना मुलाचे संगोपनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.
■ श्री. शामराव भिडे कार्यशाळा -
14 जुलै, 1992 रोजी रत्नागिरी शहरातील शेरे नाका येथील डॉ. शेरे यांच्या घरात प्रौढ मतिमंदांच्या कार्यशाळेत व्यवसाय प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ 13 मुलांना घेऊन कार्यशाळा सुरू झाली. मुलांच्या कुवतीनुसार त्यांचा अभ्यासक्रम डॉ. शेरे आणि शमीन शेरे यांच्या मार्गदर्शनाने बनवण्यात आला. मुले हळूहळू कामात रस घेऊ लागली. मेणबत्त्या तयार करणे, कागदी पिशव्या, पाकिटे, रेक्झिनपासून सहज बनविता येण्यासारख्या पर्स, पिशव्या तयार करणे असे उपक्रम सुरू झाले.
व्यवसाय प्रशिक्षण सुरू असताना 2003 पासून कार्यशाळेला शासनाकडून अनुदान सुरू करण्यात आले.
गेले काही महिने करोना आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद आहेत. या काळात सामान्य विद्यार्थ्यांच्याच शिक्षणाची अडचण झाली आहे, तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींची कल्पनाच केलेली बरी; मात्र रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील श्यामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र या कठीण काळातही आपली परंपरा राखली आहे. दर वर्षी हे विद्यार्थी दिवाळीसाठी कलात्मक वस्तूंची निर्मिती करतात. संस्थेतर्फे या उत्पादनांची विक्री केली जाते. यंदाही या विद्यार्थ्यांनी परंपरा घरूनच काम करून राखली आहे. संस्थेची वेबसाइटही अद्ययावत करण्यात आली असून, तेथे या उत्पादनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून प्रति वर्षी विविध वस्तू तयार होत असतात. या वस्तूनिर्मितीकरिता त्यांना कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षी यामध्ये खंड पडणार अशी शंका येत होती. परंतु या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, व्यवस्थापक, पालक आणि कार्यशाळा जोडलेले असतात आणि म्हणूनच दिवाळीकरिता विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून विविध वस्तूंची निर्मिती कमी प्रमाणात का होईना, पण करण्यात आली आहे.
सध्या श्री. शामराव भिडे कार्यशाळेमध्ये आकाश कंदील, रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या मेणबत्त्या-पणत्या, आयुर्वेदिक उटणे, उटणे वडी, लहान-लहान आकर्षक आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड, विविध प्रकारची फुले, प्रेझेंट पाकिटे, इत्यादी वस्तू विक्रीकरिता उपलब्ध आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या ऑर्डर कुरियरद्वारेपाठविल्या जात आहेत. प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या वस्तू नागरिक किंवा संस्था खरेदी करू शकतील.
याशिवाय या कार्यशाळेत कापडी कॅरी बॅग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स, फोल्डर्स, कागदापासून तयार केलेले गुलाब पुष्प व गुलाब पुष्पगुच्छ, इत्यादी वस्तूही तयार केल्या जातात.
सर्व सण समारंभ शाळेत चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत यासाठी अविष्कर संस्था प्रयत्नशील असते आषाढी एकादशीची दिंडी त्याचप्रमाणे नागपंचमीसाठी कागदाच्या लगद्यापासून तयार केली पर्यावरण पूरक नागमूर्ती आणि तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येईल ही मुले कागदाचा लगदा आणि मातीपासून तयार करतात आणि त्याची स्थापना ही करतात .
नॅशनल ऑलिंपिकसाठी रत्नागिरीतून प्रथमच कार्यशाळेतील विद्यार्थी हरियाणाला गेले. तेथे मुलांनी सुवर्णपदके मिळवली; तसेच सुमय्या पटेल ही विद्यार्थिनी स्पेशल ऑलिंपिकसाठी बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला जाऊन आली.
03 डिसेंबर, 2007 रोजी संस्थेला केंद्र सरकारकडून देण्यात येणारा National Award for Empowerment of Persons with Disabilities हा व्यक्ती / संस्था यांना देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार तत्कालिन राष्ट्रपती श्रीम. प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते मिळाला आहे. याच कार्यक्रमात शाळेमधील एक माजी विद्यार्थी व आता शाळेमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी याला उत्कृष्ट कर्मचारी म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
💐💐💐 ' आविष्कार ' संस्था, संस्थाचालक, सभासद, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना रत्नागिरी मीडिया परिवाराकडून वर्धापनदिनाच्या तसेच, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी .
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.