आज - 20 ऑक्टोबर - रत्नागिरी शहराती टिळक आळी येथे असलेले टिळक आळी पिंपळपार  मंदिर -

आज    - 20 ऑक्टोबर  - 

 

रत्नागिरी शहराती टिळक आळी येथे असलेले टिळक आळी पिंपळपार  मंदिर  - 

 

जसे श्री विठ्ठल मंदिराचे महात्म्य तसेच रत्नागिरी शहरातील मधली आळी किंवा टिळक आळी येथे असलेले टिळक आळी पिंपळपार  हे धार्मिक ठिकाण किंवा  मंदिर आहे . 

              रत्नागिरी शहरातील  काँग्रेस भुवन ते झाडगावकडे जाणारा  रस्ता म्हणजे मधलीआळी  किंवा टिळक आळी . या टिळक आळीत  खेर  - खंडकर  - परांजपे या कुटुंबियांच्या हद्दीलगत एक पार होता . त्या पारावर एक डेरेदार अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्ष फार पूर्वीपासून होता.  हा वृक्ष किती पुरातन हे जरी निश्चित सांगता येत नसले तरी वाडवडिलांकडून  ऐकलेल्या हकीकतीप्रमाणे तो 200 वर्षांपूर्वीचा असावा  व  या पिंपळाच्या बुंध्याशी रानडे नामक गृहस्थांनी मारुतीरायाची स्थापना केली होती . त्याचठिकाणी दत्तपदुका व शिवलिंगही स्थापित आहे . 

              पिंपळपारावर बायका पुरुष दर्शनासाठी येत.सहाजिकच श्रद्धेने प्रदक्षिणा करणे पारावर दीप लावणे -  त्याच्या सानिध्यात स्तोत्रे म्हणणे -  मंत्र पठण करणे इत्यादी कार्य श्रद्धाळूनी आपापल्या परीने केली  . आळी मध्ये राहणाऱ्या परिवारांची सुखदुःख ही या  अश्वत्थाने पाहिली .  सर्व ऋतूत खंबीरपणे उभा राहिला  .  

               आज तो अश्वत्थ वृक्ष मात्र नाही . पण स्थापित केलेल्या मूर्तीरूपतील देवता तेथेच मंदिरात आहेत . परंतु पिंपळवृक्षाचा आदर  भाविक आजही तेवढाच करतात .म्हणूनच देवळाला  'पिंपळपार ' असेही संबोधतात . 

               शंभर वर्षांपूर्वीची रत्नागिरी तशी खेडवळच होती . अरुंद खडबडीत रस्ते - दिवाबत्तीची सोय नाही . काळोख पडल्यावर रस्त्यावर चिटपाखरूही दिसायचे नाही . वडपिंपळावर भुते असतात असा समजही होता . त्यामुळे तिन्हीसांजेनंतर पाराकडे कोणी फिरकण्याची शक्यता कमीच .

                  आत्ता जिथे श्री गणपती मंदिर आहे तिथे वड व पिंपळ अशी दोन झाडे होती . ती तोडून तिथे मंदिराचे बांधकाम करण्यात आले . यावेळी आळीतील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या . याकामी मांडवी येथील कै . नाना सुर्वे यांचेही सहकार्य लाभले .

                1910 साली पारावरील गणेशमूर्ती वर्गणी काढून आणली होती . ही मूर्ती कै . भांबुदादा( दिनकर कृष्ण) जोशी यांचे घरी ठेवली होती . पण त्यावेळी कै . कृष्णाजीपंत जोशी  ( भांबुदादांचे वडील) यांच्या पोटात दुखायला लागले . जे काही केल्या थांबेना . म्हणून मग शेवटचा पर्याय म्हणून त्या गणेशमूर्तीपुढे प्रार्थना केली व मी तुझी प्राणप्रतिष्ठा करून रोज पूजा करीन . त्यानंतर मात्र त्यांची पोटदुखी थांबल्याचे सांगतात .  पण तेव्हापासून त्यांनी कबूल केल्याप्रमाणे आजही जोशी कुटुंबीय त्याची पूजा करत आहेत .  

                या मूर्तीची स्थापना वैशाख शुद्ध चतुर्थी म्हणजे 12 मे 1910 रोजी झाली . ट्रस्ट स्थापन होण्यापूर्वी कै . भांबुकाका जोशी गणपती स्थापना दिन साजरा करत असत .तेव्हा मंत्रजागर  व एखादे प्रवचन असायचे . आता मात्र हा उत्सव ट्रस्टतर्फे साजरा करण्यात येतो .

                 पूर्वी पारावरच्या घुमटयांवर पत्रे होते ज्यामुळे फक्त प्रदक्षिणेचा मार्ग जेमतेम झाकला जात असे .

                 सन 1928 मध्ये पारावर  शेवडेमास्तरांच्या पुढाकाराने  छत उभारले गेले. ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या . 

                  पूर्वी पारावर चातुर्मासात पुराण वाचन होत असे  . आधी सिधयेशास्त्री पुराण प्रवचन करत त्यानंतर कै.  विनायकराव जोशी पुराण सांगत  . काही महिला पुराण वाचत असत . 

                  हनुमान जयंतीच्या उत्सवात मारुतीला पूर्णपणे शेंदूर लावून लावून सजवले  जायचे  . सिधयेशास्त्रींचे प्रवचन असायचे  . विसूभटजी फडके एकादशणी करत असत  . या सर्वाचा खर्च मात्र  शेवडेमास्तर करत असत .  कै . बापू आगाशे सुंठवड्याची  खिरापत देत असत . 

                  पारावर  टिळक पंचांगाप्रमाणे एक वर्ष श्रीराम नवमीचा उत्सव कै . बापू आगाशे यांनी केला होता. त्यात कै . यशवंतराव पटवर्धन यांचे कीर्तन झाल्याचे सांगतात . 

                  पूर्वी घरोघरी टिळक पंचांगच वापरात होते. परंतु सुट्ट्यांच्या नियोजनामुळे बऱ्याच जणांनी त्यात बदल केले .

                  सन 1978 मध्ये श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान या नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला . या ट्रस्टमध्ये 1 अध्यक्ष व 4 सभासद  नेमण्यात आले .जे देवस्थानचा दैनंदिन व्यवहार तसेच हिशोबाचे काम बघतात .

                   सध्या या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री .  गिरीधर गणेश तथा उल्हास परांजपे  त्यांच्याबरोबर सर्वश्री  श्रीराम  आगाशे ; अरुण करमरकर  ; प्रभाकर करमरकर  हे काम पहातात . 

                  मंदिराला ज्या विशेष व्यक्तींनी भेटी दिल्या त्यातील 2 वैशिष्ट्यपूर्ण बाबी खाली दिल्या आहेत  - 

                  1 .22 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधी यांनी कस्तुरबा गांधींसोबत स्वातंत्रवीर सावरकर यांच्या उपस्थितीत पारावर येऊन श्री गणपतीचे दर्शन घेतल्याचे जाणकार सांगतात . यावेळी त्यांनी टिळक जन्मभूमीलाही भेट दिली .   

                    2. पारावर  1924 ते 1937 या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  अनेक भाषणे झाल्याचेही सांगितले जाते . या भाषणासाठी आजूबाजूच्या गावातील लोक बैलगाडीतून आवर्जून उपस्थित रहात असत .

                    गणेशोत्सवाच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे 2000 साली मंदिर नूतनीकरण करण्याचे  एकमताने ठरवले गेले . 2001 साली मंदिर नूतनीकरण करण्यासाठी आराखडाही तयार केला गेला . परंतु प्रत्यक्ष बांधकाम सुरू व्हायला मधला कालखंड गेल्यामुळे 2019 साली नूतनीकरण बांधकाम सुरू केले गेले व आता ते पूर्ण नव्या रुपात जसा आराखडा त्या बरहुकूम पूर्ण झाले आहे . मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल न करता मंदिराचे नूतनीकरण केले आहे . 

                    हासर्व आराखडा कोकणाची विशेषतः असलेल्या चिऱ्याचा डिझाईन साठी कल्पकतेने वापर करून डिझाईन करून बांधकाम मंडळाचेच एक कार्यकर्ते श्री प्रशांत डिंगणकर यांनी विनामोबदला पूर्ण केले आहे . 

                    आजचे श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानचे जे स्वरूप आहे त्याचे बरेचसे श्रेय कै . शेवडे गुरुजींना आहे . 

                    मंदिराची शतकपूर्ती झाली आहे .  पारावर दर शनिवारी होणाऱ्या भजनाचीही शतकपूर्ती झाली आहे . आता गणेशोत्सवही शतकपूर्ती नजीकच्या काळात पूर्ण करेल .

                     देवस्थानतर्फे साजरे केले जाणारे उत्सव - 1 . हनुमान जयंती 2. श्री गणपती प्रतिष्ठापना दिन 3 . दहीकाला 4 . गणेशोत्सव 5. त्रिपुरारी पौर्णिमा  6. वटपूजन  7 . दर शनिवारी रात्री भजन . 



माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती  स्त्रोत  - सर्व  सविस्तर माहिती सर्वश्री शशिकांत काळे - अरुण करमरकर - प्रशांत डिंगणकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली .

माहिती  नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.