आज - 20 ऑक्टोबर - टिळक आळी शनिवार भजन

आज  - 20 ऑक्टोबर  - 

 

टिळक आळी शनिवार भजन

 

कालच्या पोस्टमध्ये श्री मारुती - गणपती पिंपळपार देवस्थानची स्थापनेपासूनची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . 

                 आजच्या पोस्टमध्ये याच मंदिरात गेले शतकभरापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या शनिवार भजनाची माहिती देत आहे .

                 शतकभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखादे काम ठराविक दिवशी ठराविक वेळेवर होणे अन्यथा करणे किंवा घडणे हे तितकेसे सोपे काम नाही .

                त्यासाठी निष्ठा व भक्ती तसेच ताळमळ असणे खूप महत्त्वाचे असते .

                 पण ही परंपरा टिळक आळी पिंपळपार देवस्थानने जोपासली ही बाब अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे . 

                 टिळक आळीमध्ये दर शनिवारी होणाऱ्या भजनाचीही शतकपूर्ती झालेलीआहे ही गोष्टही  भूषणावह आहे . अभिमानाची गोष्ट अशी की ही परंपरा आजही कायम आहे व राहील असा विश्वास वाटतो . 

                 पूर्वी पारावरच्या घुमट्यावर पत्रे होते . ज्यामुळे प्रदक्षिणेचा मार्ग जेमतेम झाकला जात असे . 

                  1918 साली शनिवारी दसरा होता . त्यादिवशी काशिनाथ विनायक शेवडे या 22  वर्षांच्या तरुणाने शनिवारच्या  भजनाची सुरुवात पारावर केली . मित्रमंडळींची साथ व थोरांचे   आशिर्वाद भजन प्रथेला प्राप्त झाले . श्री मारुती गणपतीला ही परंपरा अखंड राहो म्हणून साकडे घातले गेले . त्यांच्या कृपेमुळेच गेली 102 वर्षे ही परंपरा अखंडित राहिली. त्यावेळचे साक्षीदार आज हयात नाहीत . 

                  त्यावेळी होणाऱ्या भजनाच्या चढाओढीत टिळक आळीतील नागरिक कमी पडत होते हे जाणून भजनाचे शिक्षण मिळावे यासाठी 1918 सालच्या दसऱ्यापासून पारावर कै . शेवडेमास्तरांनी भजन 

चालू केले . 

                  पहिली सुमारे 10 वर्षे अपुऱ्या जागेमुळे पावसाळ्यात भजन व्हायचे नाही . पावसाळ्यात बंद रहाणारे भजन दसऱ्यापासून पुन्हा सुरू व्हायचे . त्यामुळे पावसाळ्याच्या 4 महिन्यात देवासमोर बसून भजन करणे शक्य नव्हते . तरीही शेवडेगुरुजी व परांजपे बंधू छत्री व कंदील घेऊन देवासमोर उभे राहून अभंग म्हणायचे . भजनाची बैठक पुन्हा दसऱ्यापासून सुरू व्हायची . असे 10 वर्षे सुरु होते . 

                  रूढार्थाने पावसाळ्यात भजनाची बैठक झाली नाही  हे खरे पण संकल्प मोडला का ? अर्थातच नाही .

                  1928  साली मास्तरांनी पुढाकार घेऊन देवळावर पत्रे घालून घेतल्यामुळे त्यानंतर गणेशोत्सव व शनिवार भजन हे दोन्ही कार्यक्रम देवळातच नियमितपणे होऊ लागले . 

                  1968 साली दसरा शनिवारी आला . त्यावेळी शनिवार  भजनाला सुरुवात होऊन 50 वर्षे पूर्ण होत होती ; म्हणून मग जुन्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलावले गेले होते . त्यात दिवाणजी जोगळेकर लोवलेकर आदि मंडळी आली होती . 

                   भजनाला पहिल्या पिढीतील  कै . दिनकर अण्णा जोगळेकर ; कै . विष्णूपंत जोगळेकर ;  कै . तात्या परांजपे ; कै . बापू परांजपे ; कै . बाबूराव काळे अशा आदरणीय व्यक्तींनी साथ दिली होती . भजनाच्या सुवर्णमहोत्सवात ही मंडळी उपस्थित होती . 

                  शनिवार भजनाचा शतक महोत्सव मोठ्या दिमाखात वर्षभर साजरा केला गेला . त्यावर्षी अधिक महिना असल्याने 13 महिने  साजरा केला गेला . पैकी 12 महिने  दरमहा एक याप्रमाणे वेगवेगळ्या भजन मंडळांनी भजने सादर केली होती . शेवटच्या महिन्यात चक्रीभजन सादर झाले होते .  

                  ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2018 याकाळात ज्या भजनी मंडळांनी भजने सादर केली तो तपशील - 

01 .  श्री ओंकारेश्वर प्रासादिक भजन मंडळ लांजा ;  

02. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ कोतवडे ;  

03. श्री महादेश्वर प्रासादिक भजनी मंडळ नाडण  देवगड ;  04.  श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ हेदली  गुहागर ;  05. श्री लिंगरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुडाळ ; 

 06.  श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ अणसुर वेंगुर्ला  ; 07. सौभाग्यलक्ष्मी सोनू संगीत साधना भजन मंडळ तिवरे कणकवली ; 

08 . श्री राम प्रासादिक भजन मंडळ शिरसे राजापूर ; 

09. दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी ; 

10. गंगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरे कणकवली ; 

11. अमनायेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुरंबाड ; 

12. श्री गुरूदत्त प्रासादिक भजन मंडळ महाड ; 

13 . चक्रीभजन . 

 

  31 मार्च 2018 रोजी 3 महिला भजन मंडळांची भजने झाली त्यांचा  तपशील

 1 . चैतन्य महिला भजन मंडळ  शिवरेवाडी ; 

2.  माणिकमोती महिला भजन मंडळ  रत्नागिरी ; 

 3. जयभवानी महिला मंडळ रत्नागिरी . 

                   

                  शनिवार भजनाचे हे 109 वे वर्ष आहे . आजही आळीतील सर्व वयोगटातील आळीकर शनिवारी रात्री भजनाला आवर्जून उपस्थित असतात हे विशेष . 

                   येथे सर्वच धारकरी कोणीही बुवा नाही .तबल्याच्या ठेक्यावर व झंजेच्या तालावरील ह्या भजन परंपरेचा वारसा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे . 

                   शनिवार भजनाची   शेवडेगुरुजीनी  आखून दिलेली  पद्धत : - 

          वंदू गणराज सरस्वती भावे  - मारुतीराया बलभीमा -  धन्य अंजनीचा सूत - हेरंब मोरया वृध्दी सिद्धी रमणा हे सुरुवातीचे 4 अभंग झाले की मग आवडीप्रमाणे इतर अभंग शेवटी विनवणी व हेचि दान देगा देवा या अभंगाने विनवणी ही प्रथा अबाधित आहे . 

                   येथे सर्वच धारकरी कोणीही बुवा नाही .तबल्याच्या ठेक्यावर व झंजेच्या तालावरील ह्या भजन परंपरेचा वारसा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे .

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती  स्त्रोत  - सर्व  सविस्तर माहिती सर्वश्री  विजयराव खेर - शशिकांत काळे - अरुण करमरकर - प्रशांत डिंगणकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली .

माहिती  नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.