आज - 19 ऑक्टोबर - श्री विठ्ठल मंदिर रत्नागिरी रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री विठ्ठल मंदिर

आज  - 19 ऑक्टोबर  - 

 

 श्री विठ्ठल मंदिर रत्नागिरी

       

 

रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री विठ्ठल मंदिर म्हणजे फार पूर्वीपासून प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धार्मिक ठिकाण आहे.

हे मंदिर विष्णू पंचायतन प्रकारातील आहे. श्री विठ्ठल-रखुमाईच्या पूर्ण मूर्ती साधारणपणे साडेतीन -चार फूट उंच काळ्या पाषाणात घडवलेल्या  असून पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या उजव्या हाताला समोर श्रीसिद्धिविनायक तर मागे सूर्यनारायण असून डाव्या हाताला समोर सर्वेश्वर आणि मागे  श्रीदेवी अंबाबाई अशा चार देवता आसनस्थ आहेत. 

    

 

या मंदिराची उभारणी व बांधणी गुजर बंधूनी रत्नागिरीमध्ये केली.  शंकरदास गोपालदास गुजर यांनी हे मंदिर कधी बांधले त्याचा उल्लेख मात्र नाही.  परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांचे नातू खुद्दार लक्ष्मणदादा, खुद्दार भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी ज्येष्ठ वद्य पंचमी शके 820 ( इ. स. 1820) या दिवशी केला. आत्ता चालू आहे ते शके 1941- 42. त्यानंतर  मार्गशीर्ष  वद्य प्रतिपदा म्हणजे  27 डिसेंबर 2004 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे.

रत्नागिरीच्या इतिहासाचा एक प्रमुख साक्षीदार म्हणून या देवळाकडे बघितले जाते.

           रत्नागिरी शहराची तीन भागात विभागणी होते.  रहाटाघर – झाडगाव - नाचणे म्युनिसिपल हद्दीचे आत. पैकी रहाटाघर हे मूळ रत्नागिरी गाव. हे मंदिर रहाटाघर ह्या शासकीय गावांमध्ये एक नंबरच्या सर्वे क्रमांकाने नोंदले गेलेले आहे. इतके पुरातन किंवा जुने हे मंदिर आहे. 

           त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या या मंदिराला महत्त्व आहे. पूर्ण हिंदुस्थानात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असे महात्म्य या मंदिराचे आहे. 

            या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत येताना संत चोखामेळा म्हणजे पूर्वी ज्याला संत चोखा महार म्हणत; म्हणजेच पूर्वीच्या महार समाजाचे कुलदैवत होय. त्याची येथे समाधी आहे. त्यावेळी त्यावेळच्या समाज रूढी प्रमाणे दलितांना मंदिर प्रवेश नव्हता ;त्यामुळे ते मंदिर प्रवेशद्वारात असलेल्या संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथूनच पांडुरंगाला नमस्कार करत असत.

            ही समाजरूढी मोडण्यासाठी त्याकाळच्या सनातन्यांचा विरोध डावलून याच मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ह्या मंदिराच्या पायरीवर उभे राहून एका दलित माणसाचा हात धरून त्याला या मंदिरात प्रवेश करायला लावला होता. परंतु त्याने मंदिरात प्रवेश केला नाही. हा इसम म्हणजे शिवा चुना चव्हाण होय. ह्या घटनेच्या वेळी त्यावेळच्या सनातन्यांनी या मंदिर प्रवेशा विरोधादरम्यान सावरकरांच्या कपाळावर एक काठी बसली होती. त्या जखमेतून सांडलेले रक्त मंदिरात प्रवेश करतानाच्या पायरीवर सांडले होते. तिला नामदेव पायरी म्हणतात. तेथे सावरकरांचे रक्त सांडल्याचे आजही लोक सांगतात. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम जरी झाले असले तरीही ती पायरी मात्र आजही तशीच ठेवण्यात आली आहे.  

          

           दलितांना या मंदिरात प्रवेश मिळाला नाही म्हणून मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतील थोर दानशूर भागोजीशेठ कीर यांना विनंती करून त्यांच्या माध्यमातून रत्नागिरीत पतितपावन मंदिर बांधले. ज्याची ख्याती अखंड हिंदुस्थानमध्ये आहे. त्या मंदिरात विष्णूलक्ष्मीची मूर्तीआहे. जी पतितपावन म्हणून जगभर ओळखली जाते . 

             आणखीन एक महत्त्वाची घटना म्हणजे लोकमान्य टिळकांचे पोस्टल तिकीट त्यावेळच्या ब्रिटिश  सरकारने छापले होते. त्याचा  मोठा अनावरण सोहळा मुंबईमध्ये ब्रिटीश गव्हर्नरांच्या हस्ते होणार होता; अशी बातमी मिळाल्यामुळे रत्नागिरीतील काही मातब्बर मंडळींनी ते तिकीट मुंबईत अनावरण सोहळा होण्याआधी मिळवले व सदर तिकिटाचे अनावरण झाले म्हणून घोषित केले. का तर ज्या लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने छळलेले आहे त्या ब्रिटिश सरकारच्या गव्हर्नरांच्या हस्ते हा तिकीटाचा अनावरण कार्यक्रम घडून द्यायचा नव्हता.

               तुकाराम महाराज यांनी इथे येऊन या मंदिरात कीर्तन केल्याचे आजही लोक सांगतात.  

               ब्रिटिश काळापासून मंदिराला बारा रुपयाची सनद आहे. 

              

 

                साजरे होणारे उत्सव - गुढीपाडव्याला गुढी उभारणे; श्रीराम नवमीला श्रीराम जन्मोत्सव; अक्षय्य तृतीया; गोकुळाष्टमी; दहीकाला यानंतर अश्विन महिन्यामध्ये नवरात्र उत्सव. 

 

               अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कार्तिक उत्सव संपूर्ण एक महिनाभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पूर्ण महिना काकड आरती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.  पूर्वी काकड आरतीला गर्दी असायची परंतु कालानुरूप गर्दी कमी झाल्याचे दिसते. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी पासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत म्हणजे चातुर्मासात येणाऱ्या दहा एकादशा व एखाद्या वर्षी अधिक महिना आला तर त्यातील दोन एकादशा अशा बारा एकादशीला विठ्ठलाच्या पालखीची दिंडी संपूर्ण शहरात फिरवली जाते. कार्तिकी एकादशीच्या मध्यरात्री साधारणपणे पहिला दिवस सुरु होतो. यावेळी रथ उत्सवाची मिरवणूक सुरू होते. याबाबतची मान्यता अशी की ही मिरवणूक पंढरपुरात गेली किंवा पंढरपूरला जाते अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून काढली जाते.

 

            कार्तिकी एकादशीच्या उत्सवाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होत असते. रत्नागिरी मधील धनजी नाक्यावर जो दर्गा आहे तेथे फार जुन्या काळापासून दर्ग्याजवळचा परिसर या दिवशी स्वच्छ करून ठेवला जातो. ही पालखी या दर्ग्यापर्यंत जाऊन तेथील दर्गा प्रमुखांना नारळ प्रसाद वगैरे देऊन परत येते. ही प्रथा आजही गुण्यागोविंदाने होत आहे व सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे.

रत्नागिरी शहराचे आणखी एक वैशिष्ट्य असे की संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये दोनच देवस्थानच्या नगरप्रदक्षिणा होतात - एक विठ्ठलाच्या पालखीची व दुसरी रत्नागिरी ग्रामदैवत श्री भैरी बुवाच्या पालखीची. आषाढ शुद्ध दशमीला श्री भैरवाच्या नगरप्रदक्षिणा तर कार्तिक शुद्ध त्रयोदशीला विठोबाची नगरप्रदक्षिणा होते. ही नगरप्रदक्षिणा जुन्या रत्नागिरीच्या पूर्ण सीमेवरती फिरून मध्यरात्री देवळात परत येते.

 

कार्तिक वद्य द्वादशी हा मधला एक दिवस आहे. धार्मिक परंपरेप्रमाणे हरिहरेश्वर भेट म्हणून  हा दिवस धरला जातो. हरिहरेश्वर भेटीचे औचित्य साधून रथाची मिरवणूक मंदिरात परत आल्यानंतर पालखी इथून खालच्या आळीतील तृणबिंदुकेश्वर मंदिर जे श्री शंकराचे देवस्थान आहे त्या देवळात भेटायला जाते. त्या ठिकाणी  श्री भगवान शंकरांना भेटायला विठोबा जातो अशी ही हरिहरेश्वर भेट. कार्तिक द्वादशीला श्री शंकराना भेटून परत आल्यानंतर त्रिपुर लागतो अशी परंपरा. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. 

या मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवाला एका रथातून तर कार्तिकी एकादशीला दुसऱ्या रथातून श्री विठ्ठलाची मिरवणूक निघते. 

                 अन्य जे उत्सव मंदिरात साजरे केले जातात त्यात दत्तजयंती उत्सवही फार पुरातन काळापासून साजरा केला जातो. अशा या पुरातन मंदिराला रत्ननगरीत येवून अवश्य भेट द्या

     ।। जय जय विठोबा रखुमाई ।।  ।। जय हरी विठ्ठल ।।

                                    

                     ।। ओम राम कृष्ण हरी ।।

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती  स्त्रोत  -   श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त श्री. विजयराव पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे .            माहिती  नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.