आज  - 05 ऑक्टोबर  -  नवरात्रोत्सव  - ०३ श्री नवदुर्गा देवी वरचा पाट गुहागर जि. रत्नागिरी

आज  - 05 ऑक्टोबर  - 

 

नवरात्रोत्सव  - ०३

 

श्री नवदुर्गा देवी वरचा पाट गुहागर जि. रत्नागिरी 

 

दि. 03 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र निमित्ताने  09 -  श्री देवीच्या मंदिरांची माहिती   - 

 

श्री नवदुर्गा देवी हे त्रिगुणात्मक असून श्री महाकाली (शक्तिदात्री), श्री महालक्ष्मी (ऐश्वर्यादात्री), व श्री महासरस्वती (बुद्धिदात्री)  यांचे एकवटलेले स्वरूप होय. 

रघुनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या वाडेश्वर माहात्म्य ग्रंथामध्ये नमूद केले आहे की, श्रीधर या योगीपुरुषाने गुहागर हे गाव निर्माण केले.  व पुरातन काळापासून असलेल्या दुर्गादेवी मंदिराची जागा बदलून जवळजवळ तीनशे फूट आत या मंदिराची स्थापना केली. 

ज्याठिकाणी पुरातन मंदिर होते तेथे एका धर्मस्तंभाची स्थापना केली. पूर्वी वादामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी व देवीकडून कौल घेण्यासाठी ह्या धर्मस्तंभाचा उपयोग केला जात असे. 

हबशांच्या व यवनांच्या त्रासामुळे दग्ध झालेल्या व विध्वंस झालेल्या मूर्तीच्या जागी नवीन संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली. गुहागर येथे नवा गावं वसवल्यानंतर येथे आलेल्या चित्पावन घराण्यांनी हे अतिशय पुरातन देवस्थान आपले दैवत मानले व श्री नवदुर्गा ही येथील अनेक चित्पावन कुटुंबियांची कुलस्वामिनी झाली. श्री नवदुर्गा देवी ही दशभुजा असून आपल्या भक्तांचे सर्व संकटापासून रक्षण करते. 

या देवीची सकाळी, मध्यान्ही व सायंकाळी अशी तीन रूपे असतात. मराठवाडयातील चित्पावनांची कुलस्वामिनी श्री देवी अंबाजोगाईचे मूळ पीठ हे श्री नवदुर्गा देवी होय. 

श्री नवदुर्गा देवीचे मंदिर हे गुहागर बसस्थानकापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराला विस्तीर्ण आवार असून रस्त्यावरील देवीच्या खांबापासून आत सरळ चालत आल्यावर सुमारे तीनशे फुटावर देवीचे मंदिर आहे. 

मुख्य मंदिराशेजारी लक्ष्मीनारायण व शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या मंडपावर भक्तनिवास असून बाजूला धर्मशाळा आहे. मंदिराच्या ईशान्येस मोठे तळे आहे. 

या देवस्थानचे वार्षिक उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत वासंतिक नवरात्र व आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमीपर्यंत शारदीय नवरात्र हे होत. यावेळी बोडण, गोंधळ, भजन, कीर्तन वगैरे अनेक कार्यक्रम येथे होतात. 

श्री नवदुर्गा देवी, श्री वैजनाथाबरोबर लग्न करण्यासाठी परळी वैजनाथला निघाली असता काही कारणांनी तिला उशीर झाला व ती अंबाजोगाईला पोहोचेपर्यंत रात्र झाली व गोरज मुहूर्ताची वेळ टळून गेल्यामुळे श्री वैजनाथ कैलासावर निघून गेले. त्यामुळे श्री नवदुर्गा देवीने अंबाजोगाई येथे वास्तव्य केले व तेथे कुमारिकेच्या रूपाने स्थिर झाली. त्याचप्रमाणे नवदुर्गा देवीच्या शांतिस्वरूपाने दंतासुर या दैत्याचे निर्दालन केल्याने या क्षेत्रास श्री योगेश्वरी अंबाजोगाई हे नाव पडले. 

 

सदर माहिती  '  कुलदैवत  ' या अजित पटवर्धन यांच्या पुस्तकातून साभार. 

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.