आज - 17 नोव्हेंबर - त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने होणारा उत्सव श्री देव गंगेश्वर देवस्थान, कोळंबे ता. रत्नागिरी -

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने उत्सव होतो श्री देव 

 गंगेश्वर देवस्थान कोळंबे इथला

 

रत्नागिरी शहरापासून पावस कडे जाताना अगदी लगेच म्हणजे 10 - 12 किलोमीटर अंतरावर लागणार गाव म्हणजे कोळंबे आणि तिथलं जागृत देवस्थान आहे श्री देव गंगेश्वर.या मंदिरात साजरा होतो त्रिपोरोत्सव या उत्सवाची आणि त्याकरिता होणाऱ्या नाटकाची परंपरा आहे तब्बल 150 वर्षे हून अधिक वर्षांची. 

या उत्सवात आरती, भोवती, मंत्रपुष्प, नामस्मरण, पुराणवाचन, कीर्तन,भजन, नाटक असे कार्यक्रम अव्याहतपणे सुरू असतात. 

उत्सवा निमित्ताने होणाऱ्या नाटक सादरीकरण परंपरेत कधीही खंड पडला नाही. या उत्सवाचे नाटक हे लळीताचे नाटक असते. म्हणजे प्रथम किर्तनाचा पूर्वरंग त्यानंतर उत्तररंग म्हणून नाटक केले जाते. त्यानंतर लळीताचे किर्तन होते.कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक वद्य द्वितीया असा उत्सव असतो. उत्सवा निमित्ताने नात ही परंपरा वरती उल्लेख केल्या प्रमाणे अखंड सेवारूपणे चालू आहे आदींच्या पिढीने नव्या पिढीकडे वारसा सोपवावा तितक्याच लीलया दीडशे वर्षांचा प्रदीर्घ प्रवास या नाट्यपरंपरेने पार केला आहे. यामध्ये आधी संगीत, मग ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक अश्या सर्व प्रकारच्या नाटकांची सादरीकरण या रंगमंचावर सादर झाली आहेत. 

आता आपल्या लक्ष्यात आलंच असेल की दीडशे वर्ष नाटक घडणारा रंगमंच म्हणजे पेट्रोमॅक्स च्या बत्तीवर नाटकं जिथं घडली असतील असा मंच. म्हणजेच जेव्हा स्त्रिया नाटकात काम करत नसत पर्यायाने पुरुषच स्त्री पात्र रंगवायचे हे पाहणारा मंच.आणि बालगंधर्वांपासून ते असंख्य किर्तनकारांच्या पठडीनी पाहिलेला आणि आत्मसात करत वृद्धिंगत झालेला असा मंच. तंत्रांच्या भडिमारा ऐवजी मूळ कथानकं, अभिनय आणि विषायाबरहुकूम रंगमंचीय अविष्करण जगलेला मंच तो हाच मंच. 

या मंचावर सन 2024 च्या उत्सवात म्हणजे चालू उत्सवात सादर होणार आहे प्रा.वसंत कानेटकर लिखित अजरामर ऐतिहासिक नाटक ' रायगडाला जेव्हा जाग येते ' नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे मोहन दामले यांनी तर यातील भूमिका अनिल फडके, श्रावणी दामले, गौरी दामले, नारायण दामले, यतीन दामले, वल्लभ दामले, वरद दामले आणि कैलास दामले या स्थानिक कलाकार - रंगाकर्मींनी साकारल्या आहेत. 

वर मी उल्लेख केला नाट्य तंत्रांचा त्यावरून सहज आठावला तो रुळाचा पडदा. नव्या आणि नाट्यगृहात नाटक करणाऱ्या मंडळींना हा पडद्याचा प्रकार माहीतही नसेल तर तो असा की आपले देवस्थानां मधले नाटका निमित्त बनवलेले पूर्वीचे तात्पुरते मंडप असोत की आता वरती पत्र्याच्या केलेल्या शेड असोत त्यांची उंची ही कमीच असायची मग आता तिथे सारकणारा पडदा हा एकच उपाय उरत असे अश्यावेळी वर जाणार पडदा आणि तोही वरती झिरो होणारा पडदा कुठला आणि कसा बांधायचा यावर कोकणी माणसांने शोधलेला बेजोड उपाय म्हणजे रुळाचा पडदा. या पडद्यासाठी पूर्वी हलक्या लाकडी पट्टयांपासून रंगमंचा इतका लांब गोल रूळ बनवला जात असे त्याच्या दोन्ही टोकांना रस्सीच्या वळया चढवून त्याला रोटेटिंग मूव्हमेंट मध्ये खालीवर करून पाहिला जाई त्याची मूव्हमेंट स्मूथ झाली की त्याला पडदा बांधला जाई. मंडपी मधून येणाऱ्या रस्सीवर बाधंलेला हा पडदा इतका ताठ आणि चुन्या विरहित दिसे की वाह ! दुसरे असे की तो विसर मंडपी पाशी एकवटला जाऊन अगदी झिरो जागा अडवायचा. आता असा पडदा बांधणारे कसबी लोक अगदी मोजकेच उरले आहेत.आणि नाटक वेड्या कोकणी माणसाने शोधलेला आविष्कार आता पहायलाही मिळत नाही. मला हा पडदा कसा बांधायचा हे शिकण्यासाठी उदयजी जोग नांदिवडे - जयगड यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, होतं बोट धरून शिकवलं असाच म्हणा ना. आता हा असा रुळाचा पडदा तुम्हाला पाहायला शहरात मिळणे कठीण तो ओढायला शक्ती लागते ना. पण आश्चर्य तुम्हाला पाहायचं असेल तर आज रात्री म्हणजे दि. 17 / 11 / 2024 रोजी श्री देव गांगेश्वर मंदिरातील उत्सवानिमित्त इथल्या मंचावर सादर होणाऱ्या आणि कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या दुसऱ्या नाट्यपुष्पाला पाहण्यासाठी कोळंबे गावात आवश्य उपस्थित रहा. 

नाटक आहे.कै. प्रा.वसंत कानेटकर लिखित आणि मोहन दामले दिग्दर्शित ऐतिहासिक ' रायगडाला जेव्हा जाग येते ' 

असं हे गंगेश्वर मंदिर हे गावाच्या ऐक्याचे, उत्साहाचे, एकोप्याचे श्रध्दास्थान आहे.

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी 

माहिती स्त्रोत - अमेय धोपटकर , रत्नागिरी

माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.