आज - 15 नोव्हेंबर - अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद रत्नागिरी शाखा आयोजित कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटक स्पर्धा - पहिले नाटक

आज - 15 नोव्हेंबर - 

 

शुभारंभ

 

आज लिहित आहोत एका आगळ्या वेगळ्या योगा बद्दल आपण नवी गोष्ट सुरू करतो एखादा उपक्रम वा एखादी परंपरा. त्यामध्ये बऱ्याचदा आपल्यासोबत काही योग आपोआप जुळून येतात आणि आपल्या काही ध्यानी मनी नसतानाही आपण त्यांचा भाग बनत जातो.प्रवासोबत प्रवाहित व्हावं तसे. अगदी तसंच काहीसं समीकरण जुळून आलं आहे ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरीने आयोजित केलेल्या कै.नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धे बाबत. १ नोव्हेंबर २०२४ ते १५ मे २०२५ अशी स्पर्धेची घोषणा होताच उत्सव मंडळांनी आपली नोंदणी सुरू केली आणि उद्या म्हणजेच दिनांक १६ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे तोही तितक्याच परंपरापूर्ण ठिकाणी म्हणजेच मौजे गोळप येथील श्री.हरिहरेश्वर देवस्थान येथील उत्सवात. या उत्सवाला आणि पर्यायाने नाटकाच्या प्रथेला १३५ वर्षांची उदंड परंपरा लाभली आहे. कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक चतुर्थीपर्यंत चालणारा हा उत्सव म्हणजे पूर्वसुरींनी आजच्या पिढीसाठी अखंड प्रवाही ठेवलेला ऊर्जास्त्रोत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंपरा आणि कार्यक्रमांनी खचाखच भरलेला उत्सव! यामध्ये धार्मिक कार्यक्रम आरत्या, भोवत्या,कीर्तन या सोबतच टिपऱ्या आणि पट्टया सारखे खेळ. यातून पूर्वजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडते. तर सामाजिक,संगीत,ऐतिहासिक नाटकांची बेजोड परंपरा देखील उत्सवातल्या नाट्य मंडळींनी अखंड ठेवली आहे. अशा या ठिकाणी परंपरापूर्ण रंगमंचावर उत्सवी नाटकांच्या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. आता योगायोगाचा उल्लेख कसा आला ते पाहूया या वर्षी म्हणजेच २०२४ च्या उत्सवात या मंचावर सादर होणारं नाटक हे देखील नवं कोरं नाटक आहे,सादर होणारा प्रयोग हा नाटकाचा देखील शुभारंभाचा प्रयोग आहे. आणि विशेष कौतुकाचे म्हणजे या उत्सवातील प्रयोगासाठी नवं नाटक लिहिलं जातं आणि तेही तिथल्याच स्थानिक लेखिकेकडून. या म्हणजे उत्सवी नाटकांच्या स्पर्धेची आवश्यकता का होती.या प्रश्नाला उत्तर म्हणजेच हा शुभारंभाचा प्रयोग असं नक्कीच आपण म्हणू शकतो. इथे १३५ वर्ष उत्सवाच्या निमित्ताने नाट्य परंपरा चालते त्या निमित्ताने अभिनेते, अभिनेत्री घडतात दिग्दर्शक घडतात गायक वादक आणि लेखकही घडतात आणि कुठलाही चळवळीचा आव न आणता, परंपरेचा साधा आस्तिक सदरा घालून उत्सवी रंगभूमी सहजच आपल्याला म्हणजे नाट्यावकाशाला भरभरून देऊन जाते. 

 आता थोड नाटकाबद्दल यावर्षी सादर होणारं नाटक म्हणजे सौ. प्रज्ञा रायकर जोशी लिखित आणि दिग्दर्शित नाटक 'काहीतरी वेगळं' या नाटकाची लेखन दिग्दर्शनाची जबाबदारी सौ. प्रज्ञा जोशी यांनी स्वीकारली आहे तर नितीन लिमये,राधा दाते,संतोष दाते,नेहा जोशी,चिन्मय जोशी, राजन पाटणकर,ओंकार बापट,महेश जोशी,प्रसाद जोशी,निलेश जोशी,मुक्ता जोशी आणि सौ. प्रज्ञा जोशी यांनी भूमिका साकारल्या आहेत. या साऱ्या उदात्तत्तेचा याची देही याची डोळा अनुभव घेण्यासाठी आणि कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेचा शुभारंभ होतांनाचे साक्षीदार होण्यासाठी चला आमच्यासोबत मौजे गोळपला श्री.देव हरिहरेश्वर देवस्थानच्या रंगमंचावर उद्या म्हणजेच १६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ठीक १०:०० वाजता.

 माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  व  लेखन  - अमेय धोपटकर , रत्नागिरी 

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.