आज 15 डिसेंबर -
आज 15 डिसेंबर पावस येथील संत स्वामी स्वरूपानंद यांचा तारखेनुसार जन्मदिन आहे -
।। ओम राम कृष्ण हरी ।।
।। जय जय राम कृष्ण हरी ।।
रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील प्रमुख संत क्षेत्रापैकी एक असलेले श्री क्षेत्र पावस हे होय. रत्नागिरीपासून 15 किलोमीटर अंतरावर पावस श्री संत क्षेत्र स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झाले आहे. स्वामींचा शिष्य परिवार भारतात तसेच भारताबाहेरही आहे.
आज तारखेनुसार स्वामींचा जन्मदिवस आहे .
पावस येथे आज स्वामी भक्तांचा खूप मोठा समुदाय जमा होतो .
स्वामींचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस येथे कै. विष्णुपंत व सौ. रखमाबाई गोडबोले यांच्या पोटी झाला . त्यांचे मूळ नाव रामचंद्र असे होते . स्वामीजींना 2 बंधू व 4 भगिनी होत्या . घरातील वातावरण मुळातच सांप्रदायिक असल्याने परमार्थ विषयात घरातील सर्व मंडळी कमी-अधिक प्रमाणात संस्कारित झाली होती.
1930 साली पुणे येथील बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह त्यांना लाभला आणि 'सोहम ' हा मंत्र मिळाला त्यांच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बाबामहाराज यांच्याकडून स्वामीना नाथपंथाची दीक्षा मिळाली होती. ज्ञानेश्वर हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांनी आपल्या हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढली व ती सद्गुरूंना अर्पण केली होती.
सर्वसामान्य लोकांना ज्ञानेश्वरी कळायला सोपी व्हावी म्हणून अभंग ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत लिहिली .अभंग ज्ञानेश्वरीची रसमयता, भावमयता आणि सुबोध तत्वप्रधानता या गुणांमुळे सर्वसामान्य माणसांना फार मोठा अक्षर आधारच वाटतो . गीता तत्वसार किंवा भावार्थ गीता हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ होय .त्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ संपादित केला. यालाच श्री भावार्थदीपिका सार स्तोत्रम म्हणतात. ज्ञानदेवांची समग्र अध्यात्मिक शिकवण जनमानसात उतरावी ही कल्पना या ग्रंथामागे आहे. अध्याय क्रमांकानुसार येथे ओव्यांचे विवेचन केले नाही तर विषयाच्या क्रमांकाने ओव्यांची मांडणी केली आहे . यामध्ये 108 ओव्या आहेत .ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचे हे साररूप आहे .
स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संपदेतील अनुभवाचे बोलमध्ये दोन काव्यग्रंथ आहेत - एक आहे अमृतधारा स्वामींच्या अनुभव रूप अवस्थेचे सामर्थ्यवान दर्शन हा ग्रंथ घडवतो. संजीवनी गाथा हा असाच दुसरा काव्यसंग्रह मनुष्याचे मन, बुद्धी ,चित्त, अंतःकरण यामध्ये साधनेने अलौकिक परिवर्तन घडू शकते . या परिवर्तनात संस्काराचा फार महत्त्वाचा वाटा असतो . स्फुल्लिंग प्रेरणा स्फूर्ती प्रज्ञावर्धन यामधून चैतन्याचा अक्षय प्रवाह वाहू लागतो ,तो साधने मुळेच . या अर्थाने या ग्रंथाचे नाव संजीवनी गाथा हे अर्थपूर्ण आहे.
2003 हे स्वामीजींचे जन्मशताब्दी वर्ष होते त्यानिमित्त भारतीय डाक विभागाने त्यांचे पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते .
स्वामी स्वरूपानंदानी त्यांच्या महासमाधीपर्यंत म्हणजे साधारणपणे 1934 ते 1974 ही चाळीस वर्षे पावस येथे अण्णा देसाई यांच्या अनंत निवास या घरामधील एका खोलीत वास्तव्य केले . त्यांनी अनंत निवास मधील याच वास्तव्याच्या काळात 'श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी ' 'श्री भावार्थ गीता ' ' श्री अभंग अमृतानुभव' 'संजीवनी गाथा -(अभंग संग्रह)' 'चांगदेव पासष्टी 'यासारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ लिहिले.
15 ऑगस्ट 1974 या दिवशी स्वामींनी पावस येथे महासमाधी घेतली.
।। स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
सद्गुरू चरण उपासिता।।
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे रत्नागिरी .
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.