नवरात्रोत्सव - ०१
श्री देवी योगेश्वरी, अंबाजोगाई -
आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे त्यानिमित्ताने 09 -
श्री देवीच्या मंदिरांची माहिती -
श्री देवी योगेश्वरी म्हणजे श्री दुर्गादेवीचेच दैत्यांचे निर्दालन करण्यासाठी घेतलेले रूप होय. अंबाजोगाई येथे स्थित असलेल्या श्री देवी योगेश्वरीबद्दल दोन आख्यायिका आहेत .
दंतासुर नावाच्या राक्षसाचे पारिपत्य करण्यासाठी मराठवाड्यातील भाविकांनी कोकणात येऊन श्री दुर्गादेवीला साकडे घातले. दंतासुराचा वध फक्त स्त्रीच्याच हातून होईल असा वर त्याला मिळाला होता. या बलाढ्य राक्षसाचा वध करण्याकरिता श्री दुर्गादेवी प्रकट झाली व दंतासुराचा वध करून आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसली आणि तेव्हापासून हे ठिकाण जोगाई किंवा योगाईचे अंबा झाले.
दुसरी एक आख्यायिका अशी की श्री दुर्गादेवी भोलेनाथाशी लग्न करण्यास निघाली. तिला परळी वैजनाथ येथे येण्यास उशीर झाला. गोरजमुहूर्तावर विवाह
ठरलेला होता. परंतु मुहूर्ताची वेळ टळल्यावर भोलेनाथ संतापून कैलासावर निघून गेले व तिला ही वार्ता कळल्यावर ती तेथे येऊन आंब्याच्या झाडाखाली स्थित झाली व त्यामुळे या गावाला जोगाईचे अंबा किंवा अंबाजोगाई असे नाव रूढ झाले. अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरीचे रुप हे त्यामुळे कुमारिकेचे आहे.
जयंती नदीच्या काठी असलेले हे अंबाजोगाईचे मंदिर अतिशय पुरातन असून वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे. भर बाजारपेठेतून मंदिरात प्रवेश केल्यावर एक भव्य दीपमाळ दिसते जी पूर्वाभिमुख महाद्वारासमोर आहे. तसेच उत्तराभिमुख महाद्वारासमोर सुद्धा अशीच एक मोठी दीपमाळ आहे. उत्सवाच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला दोन्ही दीपमाळावर दिव्यांची आरास केली जाते.
या मंदिराचे वार्षिक उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी( नवरात्र ) व तसेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत असतात. या उत्सवामध्ये नऊ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन व गायन असे कार्यक्रम असतात. येथे मूर्तिपूजा केली जात नसून पाद्यपूजा केली जाते.
यावेळी शतचण्डिपाठाचे हवन होते. येथील नित्यपूजा प्रथेप्रमाणे गुरव करतात. तसेच ब्राह्मणाद्वारे पादुकांवर अभिषेक केला जातो. पुजाऱ्यांशिवाय देवीला कोणीही स्पर्श करत नाहीत. देवीस रोज पुरणपोळीचा नेवैद्य केला जातो.
या हेमांडपंथी शैलीत बांधलेल्या मंदिराचे शिखर इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. हे शिखर पाच मजली असून पहिल्या मजल्यावर रामायण - महाभारतातील प्रसंगांची शिल्पे आहेत. दुसऱ्या मजल्यावर श्री योगेश्वरी देवीच्या अवतारांची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर श्री विष्णूच्या दशावतारांची शिल्पे आहेत. चौथ्या मजल्यावर नवग्रह आहेत तर पाचव्या मजल्यावर सप्तर्षी आहेत.
श्री योगेश्वरीच्या द्वादशाअवतारातील श्री मातृरुप योगिनी - गणेशाचे एक वेगळे शिल्प आहे. या स्रीरुपातील गणेशमूर्तीला अठरा हात असा मातृस्वरूप गणेश इतर कोठेही पाहण्यास मिळत नाही.
सदर माहिती - ' कुलदैवत ' या अजित पटवर्धन यांच्या पुस्तकावरून साभार.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे , रत्नागिरी .