आज - 20 ऑक्टोबर -
टिळक आळी गणेशोत्सव
आज याच मंदिराचा शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या श्री गणेशोत्सवाची माहिती देत आहे . यावर्षी कोरोनाच्या जागतिक संकटामुळे अतिशय साध्या पद्धतीने यावर्षीचा श्री गणेशोत्सव साजरा केला गेला .
आजही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या गणेशोत्सवाची श्रींची आगमन तसेच विसर्जन मिरवणूक काढली जाते ही बाब वाखाणण्याजोगी आहे . ज्याचे श्रेय मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आवर्जून उपस्थित राहणाऱ्या आळीतील रहिवासी तसेच हितचिंतक सुहृदाना जाते .
देवळामध्ये जागेच्या अभावी सुरुवातीच्या काळात श्री गणेशोत्सव ' अन्नपूर्णा ' या इमारतीच्या माडीवर होत असे .
1928 च्या सुमारास मास्तरांच्या पुढाकाराने देवळावर पत्रे घातले गेले . त्यानंतर मात्र गणपती उत्सव व शनिवार भजन नियमितपणे देवळात सुरू झाले .
लोकमान्य टिळक यांची ब्रिटीशांच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते . त्याप्रमाणे पुणे इंदोर नागपूर बडोदा कलकत्ता आदि शहरांमधून उत्सव सुरू झाले . लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीतही म्हणजेच टिळक आळीतही गणेशोत्सव सुरु झाला.
1925 सालापासून सदर उत्सव सुरू झाल्याची माहितीही आहे. कै . शंकरदास भिकुदास गुजर यांनी हा उत्सव सुरू करण्याची सूचना त्यावेळी केल्याचे सांगितले जाते . त्यावेळेचे धनवान कै . कृष्णराव फडके यांच्या घरी सभा घेण्यात आली होती.या सभेला भार्गवराम खंडकर - दिनकर कृष्ण व दिगंबरकाका जोशी - पटवर्धन बंधू - दत्तोपंत आगाशे - तात्या परांजपे - विष्णूपंत व काका जोगळेकर - शामराव भिडे - दत्तोपंत तसेच आबा व बाबा खेर -मुळ्ये वकील - बापूसाहेब व बाळासाहेब गोरे - बाळासाहेब लिमये - बाळूकाका देसाई - बाबूराव काळे - नाना करमरकर - जोग वकील - चिपळूणकर वकील - व्ही . के . जोशीवकील - रानडे वकील इत्यादि मान्यवर उपस्थित होते .
1925 मध्ये सर्वांनी मिळून भाद्रपद महिन्याचा उत्सव सुरू केला . आरत्या - धुपारती - रोज रात्री मेळा व वडगावकर बुवांचे कीर्तन असा कार्यक्रम असे . दुपारी 5 ते 6 यावेळात प्रवचन असे . मान्यवर व्यक्तींची भाषणेही होत असत . अप्पा बर्वे नाट्यसंगीत सादर करत असत . त्यांना जयरामभाऊ सुर्वे तबलासाथ देत असत .
त्याकाळच्या उत्सवावेळी सनई शिंग वाजविणारे गुरव तसेच लेझीम ढोल ताशे आदि वाद्ये वाजविणारी मंडळी उपस्थित असत . त्यावेळचे प्रसिद्ध मूर्तिकार वामनराव गोगटे सुंदर मूर्ती तयार करत असत . ती मूर्ती टिळक आळी नाक्यावर काका जोगळेकर यांच्या ओटीवर ठेवत असत . तेथून विठ्ठल मंदिर - गोखले नाका - गाडीततळमार्गे झाडगाव नाक्यावरून पारावर आणली जात असे . तिथे रीतसर पूजन करत असत . आजही श्रींची मिरवणूक तेवढ्याच दिमाखाने काढली जाते .
विसर्जन मिरवणूकीवेळी काही घरातून गणेशाला आरती ओवळण्याची प्रथा होती . मात्र सध्या ती बंद आहे . परंतु मांडवीत मात्र सुर्वे यांचेकडील आरती अद्यापही होते .
सुरुवातीला लोकमान्य संघ हा गणेशोत्सव साजरा करत असे . त्यावेळच्या काळानुरूप सजावटसुद्धा साधी सोपी असे . एक काच लावलेले लाकडी मखर त्याला वेलबुट्टीच्या कागदांनी सजवून सर्व पाराला सुरमाडाच्या सावळा व कागदी पताकानी सजावट केली जायची .
1940 साली गोविंदराव अभ्यंकर यांनी संशयकल्लोळ नाटकातील एक प्रवेश पारावर केल्याचे जाणकार सांगतात . यासाठी त्यांची रंगभूषा व वेशभूषा सदानंद मुळ्ये यांनी केली होती .
श्रींची आगमन मिरवणूक गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 10ते 12 यावेळात असायची . यासाठी शिर्के उद्योग समूहाच्या मोटारीवरून मिरवणूक निघत असे .
हल्ली श्रींची आगमन मिरवणूक आदल्यादिवशी संध्याकाळी असते .
लोकमान्य संघातील कार्यकर्त्यांची वये झाल्यामुळे पुढे उत्सव कोणी करायचा असा प्रश्न उपस्थित झाला होता . त्यावेळी मग एक वर्ष कै . लाल्या घाणेकर ( गिरणीवाले ) व एक वर्ष कै . बाळासाहेब मुळ्ये वकील यांनी पुढाकार घेऊन उत्सव साजरा केला . त्यानंतर मात्र सर्वश्री यशवंत व चिंतूतात्या जोशी - बंडोपंत लेले - गजानन बापट - माधव नेने इत्यादि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन उत्सव सुरू ठेवला . त्यावेळी या उत्सवाचे नामकरण टिळक आळी गणेशोत्सव करण्यात आले .
सन 1978 मध्ये श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान यानावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला . या ट्रस्टमध्ये 1 अध्यक्ष व 4 सभासद नेमण्यात आले जे देवस्थानचा दैनंदिन व्यवहार व हिशोबाची कामे पहातात .
या उत्सवाचे वैशिष्ट्य असे की आपले दैनंदिन जीवनातील व्यवहार सांभाळून संस्थेचे सर्व सभासद पदाधिकारी व कार्यकर्ते रहिवासी सर्वच जण हा गणेशोत्सव आपुलकीने आणि स्वयंस्फूर्तीने तसेच जबाबदारीने पार पाडतात .
सुरुवातीला देवळाला लागूनच स्टेज बांधले जात असे . 50 व्या व 60 व्या गणेशोत्सवावेळी स्टेज अनुक्रमे ग . ल . खेर यांचे अंगणात व पाराच्या मागे आगाशे यांच्या कंपौंडला लागून बांधले होते . त्या उत्सवावेळी प्रा. शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने - डॉ . प्रसाद पेठे यांचे लेकुरे उदंड झाली - कै . डॉ . दिलीप श्रीखंडे यांचे इथे ओशाळला मृत्यू - श्री. प्रकाश कुलकर्णी यांचे माझा कुणा म्हणू मी असे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
60 व्या गणेशोत्सव कार्यक्रमात कै . नानासाहेब भिडे व श्रीकांत मुकादम यांनी संगीत देवमाणूस नाटक सादर केले होते .
या उत्सवानंतर दोन वर्षांनी भगिनी मंडळाची जागा घेऊन त्याजागेत स्टेज मंडप उभारले जाऊ लागले .
गणेशोत्सवाला वर्गणीही बऱ्यापैकी जमा होवू लागल्याने तीन अंकी नाटके - एकांकिका - वाद्यवृंद असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होऊ लागले. मध्यंतरीच्या काळात दरवर्षी अमरदीप नाट्य मंडळ व टिळक आळी गणेशोत्सव नाट्य मंडळ यांची दोन - तीन अंकी नाटके सादर व्हायला लागली परंतु नंतर टिळक आळी गणेशोत्सव नाट्य मंडळाचेच तीन अंकी नाटक दरवर्षी यंदाच्या वर्षीचा अपवाद वगळता सादर केले जात होते .
कालानुरूप मखरामध्ये बदल करावा ही काळाची गरज ओळखून प्रकाश व विलास कुलकर्णी बंधू ; विजय नितोरे ; मनोहर केळकर ; आनंद भिडे ; भावे बंधू ; व इतरांच्या संकल्पनेतून पूर्वीच्या सजावटीमध्ये बदल करून नवनवीन कल्पनांचा वापर करून दरवर्षी वेगवेगळे देखावे तसेच सुंदर कलाकृती केल्या जाऊ लागल्या. या कलाकृती शहरवासीयांना आकृष्ट करून घेत असत . ज्यामुळे लोक आवर्जून देखावे/ कलाकृती पहायला गर्दी करत असत. त्यामुळे उत्कृष्ट सजावटीचे स्पर्धेत मंडळाला बक्षिसे मिळाली आहेत.
गणेशोत्सव कार्यक्रमात गेली 24 - वर्षे श्रीरंग नाट्य संस्थेतर्फे गोपाळ जोशी अविरतपणे नाटक सादर
करत आहेत.
टिळक आळी गणेशोत्सवाचे सन 2000 हे अमृत महोत्सवी वर्ष मंडळाने मोठया दिमाखात साजरे केले . या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 8 डिसेंबर 1999 ते 26 डिसेंबर 1999 याकाळात श्री गणपती अथर्वशीर्षाच्या लक्ष आवर्तनाने झाली होती.
सुरुवातीला कै . वामनराव गोगटे - कै . पेंटर सोहोनी नंतर कै . कृष्णा कांबळे पेंटर तसेच भाटकर यांच्याकडून श्रींची मूर्ती येत असे आता गेली काही वर्षे श्रीधर गोखले उत्कृष्ट मूर्ती घडवण्याचे काम करतात. मात्र आता कांबळे पेंटर यांच्याकडून श्रींची मूर्ती आणण्यात येते .
पारावर अनेक वर्षे उत्सवादरम्यान महाराष्ट्र वॉच कंपनीचे भालचंद्र काळे भिंतीवर घड्याळ आणून लावत असत तसेच लाऊडस्पीकरचे कामही बरीच वर्षे करत असत. त्यानंतर बसणकर - भाई गुरव - व आता नाचणकर व बर्वे व्यवस्था करतात .
श्रींचा मिरवणुकीसाठी सुरुवातीला शिर्के यांची मोटार त्यानंतर वाय . डी .जोशींचा ट्रक - सदाशेठ आचरेकर यांचा ट्रक विनामूल्य मिळत आहे .
उत्सवाच्या प्रारंभापासून आजतागायत महानेवैद्य हा उल्हास व नंदू परांजपे त्याचप्रमाणे यशवंतकाका जोशी यांच्याकडीलच असतो . ही सेवा दोन्हीही कुटुंबांकडून अखंडपणे सुरू आहे .
गणेशोत्सवात सातत्याने सुमारे 45 वर्षे पूजा अर्चा करणारे बंडोपंत साठे यांचा उल्लेख अपरिहार्य आहे .
असा हा वैशिष्टयपूर्ण गणेशोत्सव यावर्षी आपला शतकपूर्ती उत्सव सन 2025 मध्ये साजरा करेल अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत - सर्व सविस्तर माहिती सर्वश्री शशिकांत काळे - अरुण करमरकर - प्रशांत डिंगणकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच फोटोसाठी प्रसाद जोशी तसेच राहुल काळे यांचे सहकार्य लाभले .
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.