आज - 05 नोव्हेंबर -
नुकताच दि. 05 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरीतील समर्थ रंगभूमी या
नाट्य संस्थेने रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री श्रीम. प्रेमाताई शंकर मुरकर यांचा सन्मान केला.
त्यानिमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री श्रीम. प्रेमाताई शंकर
मुरकर यांचा थोडक्यात परिचय -
' प्रेमाताई म्हणजे हौशी रंगभूमीला पडलेलं सुखद
असं स्वप्न...'
बालकलाकार म्हणून वयाच्या बाराव्या वर्षीच 'कलीचा
संचार'या जयगड ग्रुपच्या नाटकातून रंगमंचावर संचार सुरू झाला. त्यानंतर पऱटवणे येथील नाट्य ग्रुपमधून तीन अंकी नाटकात एन्ट्री झाली.
आर्थिक परिस्थितीमुळे प्रेमाताईला ,चेहऱ्याला लावलेला
रंग उतरवता येत नव्हता.. नवीन गाव ...नवीन ग्रुप ...नवीन नाटक... नवीन चेहरे... आयुष्याची एसटी बस धावतच होती. राधाकृष्ण मंदिर, सर्वे ऑफिस, आंबेशेत, वरवडे, तोंणदे
हातीस, बसणी, जवळ जवळ रत्नागिरी तालुक्यातील
गावागावात, नाटकांमध्ये, ताईने काम केले. त्यानंतर देवगड ,विजयदुर्ग, आचरे, लांजा, राजापूर ग्रामीण भाग,
जामसंडा कट्टा, कसबा, संगमेश्वर, आरवली, दापोली,
तळेरे, म्हणजे जिल्ह्यात आणि जिल्हयाबाहेर प्रेमाताईने
अनेक संस्थांना उभारी दिली सहकार्य केले.
प्रेमाताई म्हणाली...
सगळ्या गोष्टी जमून येत होत्या, स्थिरस्थावर होत
असतानाच माझ्या आईने ,या जगाचा निरोप घेतला.
आम्हा भावंडावर दुःखाचा डोंगर कोसळला.... आता पुढे
काय करायचं ? कसं व्हायचं? हे प्रश्न उभे होते एका
बाजूला आईवरचे प्रेम आणि ती गेल्याचं दुःख... आणि
दुसऱ्या बाजूला पाच बहिणींची जबाबदारी... अश्रूंची
वाट अडवून उभी राहिले ...आता थांबून चालणार
नव्हते... कर्तव्य ,जबाबदारी टाळता येणार नव्हती...
आणि आई गेल्यानंतर विसाव्या दिवशी रंगदेवतेची सेवा करण्यासाठी उभी राहिले.... चिंचखरीच्या नाटकात काम
केले आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला...
ताई डोळ्यात अश्रू आणून हे सगळं सांगत होती.
सुमारे 40 वर्षे प्रेमाताईने नाट्य संसार थाटला होता.
स्वतःचा संसार न मांडता खूप मेहनतीने कष्टाने चांगल्या मानसिकतेमधून आपल्या पाच बहिणींना सांभाळून त्यांचे
शिक्षण आणि पुढे त्यांची योग्य वर पाहून लग्न करून दिली.
ताईला आयुष्याच्या या खडतर वाटेवर आधार होता तो
गगनगिरी महाराजांचा... हाक मारताच ते धावून यायचेत...त्यांच्याच आशीर्वादाने आत्तापर्यंतची वाटचाल,
सुखकर आणि आनंदी झाली.
नाटकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणची,अनेक माणसे
जोडली गेली. त्यांचे प्रेम मिळाले आणि म्हणूनच सुमारे साडेसातशे(७५०) नाटकातून ताईने भूमिका केल्या. रामचीताई,एखाद्याचं नशीब, साक्षात्कार, घडली मला
अश्रू फुलांची, माती सांगे कुंभाराला, अमरदान,
जन्मदाता, जन्मठेप, इथे थांबली जीवनगंगा, का व्यर्थ
जन्मले जगी ? अशा शेकडो नाटकांनी ताईला आनंद
दिला आणि आयुष्य उभं करण्यासाठी आर्थिक पाठबळ
दिलं .
संपली रात्र तिमिराची आणि रणांगार या दोन नाटकांच्या
प्रथम प्रयोगामध्ये काम करण्याची संधी ताईला मिळाली
आणि त्यानंतर त्या दोन्ही नाटकांच्या मुखपृष्ठावर फोटो
छापला गेला.
भाग्याचा क्षण असा की मायेचा संसार आणि कुलांगार
या दोन नाटकांसाठी प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर
यांचे संगीतासाठी मार्गदर्शन मिळाले.
'जीवन यात्रा 'या श्रीकांत पाटील लिखित दिग्दर्शित एकांकिकेमध्ये भाग घेऊन सावंतवाडी, कणकवली आणि
देवगड येथील स्पर्धांमध्ये उत्तम अभिनय करून
एकांकिकेला बक्षीस मिळवून दिले.
हे सर्व छान सुरू असतानाच, प्रेमाताई ला आणखी एक
धक्का सहन करावा लागला .1996 मध्ये वडील अचानक
सोडून गेले .पुन्हा एकदा झाकोळ आला. पण त्याही
प्रसंगातून महाराजांच्या कृपेने तिने आपली वाटचाल
सुरूच ठेवली.
घुडे वठार येथे भाड्याच्या खोलीत राहून हा नाट्य प्रपंच
सुरू झाला. त्यानंतर माळनाक्यात काही वर्षे वास्तव्य
केल्यानंतर, गेली 40 वर्षे शांतीनगर येथील स्वतःच्या
' गगनगिरी कृपा 'मध्ये ताई राहत आहे.
ताई म्हणते की, या माझ्या आयुष्यात मला माझ्या
बहिणीनीं व मेहुण्यानी चांगली साथ दिली. म्हणून माझे
आयुष्य सुसह्य झाले. मी आनंदी आहे. माझ्या पाठीशी
माझे महाराज आहेत.
हौशी रंगभूमीवरील अनेक दिग्दर्शकांचे मार्गदर्शन ताईला
लाभले. जयगडचे मुरली गडदे , श्रीकांत पाटील यांनी
नाटक शिकवले. तर जयवंत बुवा बोरकर, मोहन लाखन,
मुंबईचे राऊत, तसेच विजय नाटेकर, राम गोवेकर,
सुरेश घाणेकर या दिग्गज संगीतकारांनी संगीत दिलेल्या नाटकांमध्ये, ताईने भूमिका केल्या.
असा हा प्रेमाताईचा जीवन नाटकाचा प्रवास थोडक्यात
इथे मांडला आहे. नात्यातल्या आणि नात्याने जोडलेल्या माणसानी ताई वर खूप प्रेम केले.. सहकार्य केले...
महाराजांच्या आशीर्वादाने , 'गगनगिरी कृपा' ही
स्वतःची पर्णकुटी ताईने स्वतःच्या कष्टातून उभी केली
आणि त्या पर्णकुटीत ती सुखाने राहत आहे.
जय गगनगिरी महाराज .श्री स्वामी समर्थ.🌹🌹
ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री श्रीम. प्रेमाताई शंकर
मुरकर यांचे रत्नागिरी मीडिया परिवाराकडून विशेष
अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत व शब्दांकन - श्रीकांत पाटील सर, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास
हरकत नाही.